आज ललिता पंचमी .......तसे बघायला गेले तर अतिशय सामान्य दिवस.
इतर ३६५ तिथींसारखी एक तिथी. परंतु इतिहासात या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना घडली होती.
कोणती ????........
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!!
तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर जून महिन्यात म्हणजे ज्येष्ठ शु. १३ ला संपन्न झाला होता, मग हा कोणता राज्याभिषेक ????
हा होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेणार आहोत.
हा सोहोळा ज्या दिवशी पार पडला त्या दिवशी तिथी होती अश्विन शु. ५ म्हणजेच ललिता पंचमी. इंग्रजी तारीख होती २४ सप्टेंबर १६७४.
शिवकालीन म्हणजे साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी समाजात वेगवेगळे पंथ होते, तसेेच काही समज, काही चालीरीती रूढ होत्या. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात, पंंथ असा भेदाभेद केला नाही. परंतु जनमानसात या गोष्टींचा पगडा होता.
त्यामुळे काही लोकांच्या मते पहिल्या राज्याभिषेकामध्ये काही तृटी राहिल्या होत्या. काही विधी यथासांग पार पडले नव्हते. याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी त्यांची धारणा होती.
या साऱ्या गोष्टींचे निरसन व्हावे, कोणत्याही प्रकारचा पंथीय वाद उदभवू नये, तसेच एखाद्या पंथाच्या भावना दुखावल्या जाऊ नये या कारणास्तव महाराजांनी हा दुसरा राज्याभिषेक करून घेतला.
हा सोहोळा खूपच साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांना मंत्रोपदेश केला.
या राज्याभिषेकाविषयी माहिती निश्चलपुरी गोसावी लिखित ' श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू' या संस्कृत
ग्रंथातून मिळते. त्याच बरोबर पहिल्या राज्याभिषेकाबद्दल देखील मोलाची माहिती मिळते.
एकूणच बघता, दोन्ही राज्याभिषेकांचे विधी जसे वेगळे होते तसेच त्यांचे महत्त्व सुद्धा वेगळे होते. पहिल्या राज्याभिषेकामुळे मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले. तर दुसरा राज्याभिषेक सोहोळा महाराजांची सर्वसमावेशक विचारधारा अधोरेखित करणारा ठरला.....
खूप छान माहिती.... आणि मला हे माहीत नव्हते. नवे ज्ञान दिल्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक...👍🏻👍🏻👍🏻
ReplyDeleteमहाराजांच्या कालखंडातील महत्त्वाची घटना अधोरेखित केली त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.... त्यांचे गुण सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.
ReplyDeleteअनेकांना या दोन राज्याभिषेकांबद्दल माहिती नाही.
ReplyDeleteअशा विषयांवर केलेल्या लिखाणामुळे सामान्य वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर घातली जाते हे स्तुत्य.
Khupch chan
ReplyDelete