Skip to main content

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न:

किल्ले साल्हेर 

इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या प्रसंगी खानाचे सैन्य कोकणात निसटू नये यासाठी महाराजांनी मोरोपंत, शामराजपंत आणि त्र्यंबक भास्कर यांना पायदळासह प्रतापगडाच्या नैऋत्येस पारघाटात तैनात केले होते. यावरून सुरुवातीपासूनच मोरोपंत प्रशासकीय कामे आणि रणांगण अशा दोन्ही भूमिका पार पाडताना दिसतात. 
त्यातूनच शके १५८२ च्या पौष शु.१२ ला अर्थात २ जानेवारी १६६१ रोजी ते स्वराज्याचे मुजुमदार बनले. पुढे केवळ सव्वा वर्षाने म्हणजे चैत्र शु.१० शके १५८४ ( 3 एप्रिल 1663 ) रोजी महाराजांनी मोरोपंतांना पेशवेपद तर निळो सोनदेव यांना मुजुमदारी बहाल केली. तिथपासून ते अखेरपर्यंत ( ऑक्टोबर 1680 ) मोरोपंत हे पेशवेपदावर होते. राज्याभिषेकानंतर काही दिवसात महाराजांनी अष्टप्रधान व महत्वाच्या अधिकार्‍यांच्या जबाबदारी स्पष्ट करणारा ‘कानूजाबता’ तयार करविला. त्यामध्ये, 

‘मुख्यप्रधान (पेशवे) यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रावर शिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी व तालुका ताबीनात स्वाधीन होईल त्याचा रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावे. सर्व सरदार सेना यांनी त्याजबरोबर जावे. त्यांनी सर्वासमवेत चालावे.’ असा उल्लेख आहे. 

त्यानुसार मोरोपंत अनेक मोहिमांमध्ये सहभागी असल्याचे दिसते. शाइस्ताखान पुण्यात असताना त्याने सिंहगड फितुरीने हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा फितूरांचा माग काढून जरब बसवण्यासाठी महाराजांनी मोरोपंत व निळोपंत मुजुमदार यांना रवाना केले. शाइस्ताखानावरील छाप्यावेळी मोरोपंत आणि नेतोजी पुण्याच्या परिसरात फोजेसह दबा धरून बसले होते. तत्पूर्वी देखील हे दोघेही आपापल्या सैन्य तुकड्यांनिशी खानाच्या फौजेवर छापे घालत होते. 
पुढे स्वराज्याचा विस्तार झाल्यावर महाराजांनी कारभाराच्या सोयीसाठी स्वराज्याच्या एकूण मुलुख तीन भागात विभागून प्रत्येक भागाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एकेका सरकारकुनावर सोपविली. 
त्यानुसार पेशवे मोरोपंत यांना ‘कल्याण – भिवंडीपासून देखील कोलवण ( = कोळ्यांचे राज्य = जव्हारचे राज्य ) सालेरीपर्यंत वरघाट व कोंकण तसेच लोहगड व जुन्नर देखील बारा मावळे’ एवढा मुलुख स्वाधीन केला. अर्थात अखेरपर्यंत हेच मोरोपंतांचे मुख्य कार्यक्षेत्र असून सर्वाधिक लढाया व मोहिमा त्यांनी याच भागात केल्या. त्यातील सर्वात प्रमुख मोहिमा म्हणजे साल्हेर आणि जव्हार . 

मोरोपंतांचे कार्यक्षत्र 

इ.स. 1670 पासून मराठा फौजांनी जी प्रचंड घोडदौड सुरू केली त्यामध्ये पुरंदरच्या तहात गमावलेला व सोबतच मोगलाईतील इतर मुलुखही स्वराज्यात दाखल झाला. यावेळी मराठा सैन्याची एक तुकडी मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली बागलाणात धुमाकूळ घालून या प्रदेशातील किल्ले काबीज करत होती. तर खासे महाराज यांनी वर्‍हाडात कारंज्यापर्यंत मजल मारली. पुढे ही दोन्ही सैन्य एकत्र झाली व इ.स. 1670 च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी साल्हेर जिंकला. मराठ्यांच्या या तुफान घोडदौडीला पायबंद घालण्यासाठी औरंगजेबाने बहादूरखानाला दिलेरखानासहित दक्षिणेत रवाना केले. मुघल फौजांनी आल्या आल्याच साल्हेरला वेढा घातला. ही बातमी ऐकून महाराजांनी ‘दुतर्फा चालून घेऊन गनिमास गर्दीस मेळविण्याची’ आज्ञा करताच वर्‍हाडातून प्रतापराव व कोकणातून मोरोपंत साल्हेरवर चालून गेले. एकीकडून घोडदळ व एकीकडून पायदळ असा दुहेरी हल्ला चढवत तुंबळ युद्ध झाले( जाने – फेब्रु. 1672 ). याबाबत सभासद बखरीतील वर्णन बोलके आहे,

‘चार प्रहर दिवस युद्ध जाहाले. मोगल, पठाण, रजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती, उंटे आराबा घालून युद्ध जाहाले. युद्ध होताच पृथ्वीचा धूराळा असा उडाला की तीन कोस औरसचौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार मुर्दा जाहाले. घोडी, उंट, हती गणना नाही. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहाले त्यामध्ये रुतो लागले. असा कर्दम जाहाला.’ 

 या युद्धात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळवला. सुर्याजी काकडे यांनी पराक्रमाची शर्थ करत वीरमरण पत्करले. तर आनंदराव, व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले, गोंदजी जगताप, इ. सर्वच सरदार- मावळ्यांनी कस्त केली. खासे सरनौबत प्रतापराव व पेशवे मोरोपंत यांनी तलवार गाजवत मुघल फौजांना अक्षरशः पळता भुई थोडी करून सोडले. 

साल्हेर युद्धाबाबत सभासद बखरीतील वर्णन 

या यशानंतर अवघ्या तीन महिन्यांनी म्हणजे मे 1672 मध्ये महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत जव्हार – रामनगर हस्तगत करण्यासाठी निघाले. हा भाग गर्द वनराई व डोंगरांनी व्यापलेला असून अत्यंत दुर्गम होता. तरीही मोरोपंतांनी सैन्याची लहान तुकड्यांमध्ये विभागणी करून ठीकठिकाणी चौक्या बसवत दि. 5 जून रोजी जव्हारवर ताबा मिळवला. तेथून ते रामनगरवर चालून गेले. याविषयी सभासद बखरीत,

 ‘मोरोपंत पेशवे यांनी त्रिंबकगडापासून सालेरी किल्ल्यापावेतों किल्ले कित्येक घेतले. कितीएक नवे वसविले. असे चाळीस गड नवे कदीम त्यांणी घेतले. कोळवण काबीज केले. रामनगर, जवाहिर हा देश घेतल. त्या देशातही गड वसविले. अशी ख्यात केली,’ असे वर्णन येते.   

पेशव्यांच्या या स्वारीमुळे सुरतकरांचे चांगलेच धाबे दणाणले. कारण रामनगरपासून सुरत केवळ साठ मैलांवर होते. तसेच या विजयानंतर दमण येथील पोर्तुगीज पूर्वी जव्हारच्या राजाला देत असलेला ‘गावखंडी’ हा कर महाराजांना देऊ लागले. पुढे 1676 मध्ये रामनगर हस्तगत करून ते जंजिरा – दंडा राजपुरीच्या मोहीमेवर रवाना झाले. यावेळी त्यांच्याकडून काही दिरंगाई झाल्यामुळे लाय पाटील यांनी शिड्ड्या लावूनही किल्ला जिंकता आला नाही. यासाठी महाराजांनी मोरोपंतांना बोल लावला होता. 
असे असले तरी मोरोपंत हे महाराजांच्या खास विश्वासातील लोकांपैकी एक होते. इंग्रजांसारखे त्रयस्थदेखील मोरोपंतांचा उल्लेख ‘Sevagy’s greatest favourite’ असा करतात यावरून ही बाब स्पष्ट होते.     
अर्थात मोरोपंतांचा वकूब आणि महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारीही तितकीच मोठी होती. युद्धमोहिमा व प्रशासकीय कामांच्या बरोबरीने त्यांना दुर्गबांधणी व वास्तूशास्त्राचेही ज्ञान होते असे दिसते. म्हणूनच महराजांनी त्यांना प्रतापगड बांधण्याची आज्ञा दिली. त्याच प्रतापगडावर श्री भवानीची स्थापना सुद्धा महाराजांनी त्यांच्या हस्ते करविली होती. राज्याभिषेकासमयी युवराज शंभूराजे व आचार्य गागाभट्ट यांच्या समवेत सिंहासनाच्या जोत्यावर / पायरीवर बसण्याचा मान त्यांना देण्यात आला होता.  
एकूणच इ.स.1662 पासून इ.स.1680 पर्यंत म्हणजे जवळपास 18 वर्षे त्यांनी स्वराज्याच्या पेशवेपदाची धुरा सांभाळली. महाराजांचे रायगडावर अकाली निधन झाले त्यावेळीही मोरोपंत मुलुखगिरीवर होते. श्राद्धविधी झाल्यानंतर ते रायगडी पोहोचले. महाराजांच्या पश्चात नवीन राजा कोण होईल यासाठी झालेल्या संघर्षात मोरोपंत काही काळ कैदेत होते. त्यानंतर काही महिन्यांत अर्थात शके १६०२ मध्ये अश्विनच्या वद्य पक्षात म्हणजे इ. स. १६८० च्या सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 
युद्धमोहिमा, प्रशासन, दूर्गबांधणी अशा विविध भूमिका पार पाडत थोरल्या छत्रपतींच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या या पेशव्यांच्या कार्याचे स्मरण राहावे यासाठी हा लहानसा प्रयत्न. 
बहुत काय लिहिणे ?



संदर्भ:
शककर्ते शिवराय – श्री. विजयराव देशमुख.
शिवछत्रपतिंचे आरमार – श्री. गजानन भास्कर मेहेंदळे.
Shivaji His Life and Times – G.B. Mehendale.
सभासद बखर. 

Photo credits:
• Salher fort - Wikipedia 
• सभासद बखर.

Comments

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...