बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...
साल्हेरचे रणआग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमला केली. शाहजाद्याने याची पूर्वकल्पना मराठ्यांना दिल्याने ही मंडळी अटकेचे फर्मान पोहोचण्यापूर्वीच तिथून निसटली व महाराजांकडे परतली. या घटनेमुळे मराठ्यांना मुघलांविरुद्ध आघाडी उघडण्याची आयतीच संधी मिळाली. महाराजांनी लगोलग पुरंदराच्या तहात गमावलेला आणि मुघलांच्या हाताखालचा इतर मुलुख जिंकून घेण्याचा सपाटा लावला.
इ.स. १६७० सालच्या एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान दख्खनच्या सुभेदारीवर नियुक्त शाहजादा मुअज्जम आणि दिलेरखान यांच्यातील भांडण ऐन रंगात आले. त्यामुळे दख्खनेत मुघलांची बाजू ढिली पडली. या परिस्थितीचा फायदा घेत सुरत, बागलाण, खानदेश, वर्हाड या मोगली मुलुखात मराठ्यांची तुफानी घोडदौड सुरू झाली. इ.स.१६७० च्या अखेरीस महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. एक तुकडी मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली बागलाण मध्ये धुमाकूळ घालू लागली. यावेळेस दाऊदखान कुरेशी हा मुघलांचा सरदार मरठ्यांच्या पाठलागावर होता. दाऊदखानाचे लक्ष बागलाण मध्ये लागलेले असतानाच खासे महाराज दुसर्या तुकडीनिशी वर्हाडात कारंजा शहरावर चालून गेले. दरम्यान मोरोपंतांनी बागलाणात छापे घालून दाऊदखानाला हैराण केले. कारंज्याहून परतताच या दोन्ही तुकड्यांच्या २०,००० फौजेनिशी महाराजांनी साल्हेरला वेढा घातला. माळा लावून मराठा फौजेने किल्ल्यात प्रवेश केला. लढाईत साल्हेरचा मुघल किल्लेदार फतुल्लाहखान पहिल्याच हल्ल्यात मारला गेला. त्याच्या बायकोच्या भावाने वाटाघाटी करून किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला.
जानेवारी १६७१ मध्ये साल्हेरचा बुलंद किल्ला स्वराज्यात सामील झाला. बागलाणात वर्चस्व ठेवण्याच्या दृष्टिने साल्हेर अत्यंत महत्त्वाचा होता. सुरत, बुर्हाणपुर, औरंगाबाद, नंदूरबार, नाशिक या मुघलांच्या महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय शहरांना जोडणार्या मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी साल्हेर अतिशय उपयुक्त होता. तसेच मोगलाईत म्हणजेच गुजरात व खानदेशच्या समृद्ध सुभ्यांवर स्वारी करण्यासाठी देखील साल्हेर हे सरहद्दीवरील एक भक्कम ठाणे प्राप्त झाले होते. लष्करी परिभाषेत सांगायचे झाल्यास, साल्हेरच्या रुपाने स्वराज्याच्या उत्तरेकडील विस्तारासाठी एक नवा ‘अग्रणी तळ’ (forward base) मिळाला. या तळाचा उपयोग सुरत, बुर्हाणपुर, औरंगाबाद या महत्त्वाच्या मुघली शहरांवर वचक ठेवण्यासाठी होणार होता.
तर दुसरीकडे मुघलांच्या दृष्टिकोनातून साल्हेरचा विचार करताना, मराठ्यांच्या हल्ल्यांपसून दख्खनेतील आपली प्रमुख शहरे व व्यापारी मार्ग यांच्या संरक्षणासाठी साल्हेर हे बागलाणमधील केंद्र ताब्यात असणे गरजेचे होते. साल्हेरचे हे भू-राजनैतिक महत्व लक्षात घेतल्यास मराठे व मुघल दोघेही साल्हेर आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी का झटत होते व पुढे काही महिन्यातच याच साल्हेरसाठी एक प्रचंड युद्ध का लढले गेले याचा उलगडा होतो.
साल्हेर हातचा गेल्याची वार्ता कळताच औरंगजेब अधिकच अस्वस्थ झाला. मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी त्याने पूर्वीच महाबतखानाला रवाना केले होते. दाऊदखानासोबत मिळून महाबतखानाने मराठ्यांनी नुकतेच जिंकलेले बागलाणमधील अचला, मार्कंडा, जवळा व अहिवंत हे किल्ले परत मिळवले. एकीकडे साल्हेरभोवती फासे आवळत असतानाच दुसरीकडे मुघल सरदरांच्या आपापसांतील धुसफुस काही केल्या संपत नव्ह्ती. परिणामी साल्हेर हाती न येताच औरंगजेबाने दाऊदखानाचा बदलीचा अर्ज मान्य केला तसेच महाबतखानालाही अफगाणिस्तान मोहिमेसाठी उत्तरेत बोलवून घेतले. अशा प्रकारे, साल्हेरचा प्रश्न अनुत्तरितच राहिला. शेवटी या कामी त्याचा दुधभाऊ बहादूरखान कोकल्ताश आणि दिलेरखान यांची रवानगी करण्यात आली. तसेच इख्लासखान मियाना, राव अमरसिंह चंदावत, मुहकमसिंह चंद्रावत, इ. अनेक जण या मोहिमेत सहभागी झाले.
मुघलांनी तत्परतेने साल्हेरला वेढा घातला. गडावरचे मराठे चिवटपणे झुंजू लागले. महिनाभर वेढा घालूनही गड दाद देईना, शेवटी इख्लासखानाला २०,००० फौजेनिशी वेढ्याचे काम चालवायला सांगितले व बहादूरखान सुप्याच्या रोखाने निघाला. याच सुमारास रवळा किल्ल्यास वेढा घालून बसलेल्या दिलेरखानाच्या बंदोबस्तासाठी मोरोपंतांनी १२,००० मावळे पाठवले. मराठ्यांनी छापे घालून दिलेरला वेढा उठवायला भाग पाडले व तो मराठ्यांच्या पाठलागावर लागला. कणेरागडाजवळ रामाजी पांगेरा नावाच्या एकहजारी सरदाराने ७०० मावळ्यांनिशी १२०० पठाणांविरुद्ध लढून दिलेरखानाला अक्षरशः तोंडात बोट घालायला लावले. सभासदाने याचे वर्णन करताना म्हटले आहे की,
एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडले.... सातशे माणूस व रामाजी पांगेरा सर्वही उघडे बोडके होऊन एक एकास वीस वीस तीस तीस जखमा तिराच्या, बर्चीच्या लागल्या. लोक मेले. मोठे युद्ध झाले.
[सप्तप्रकरणात्मक (मल्हार रामराव चिटणीस कृत) बखरीमध्ये या युद्धाची हकिगत देताना रामाजी पांगेरा ऐवजी रुमाजी नळगे हे नाव आले आहे.]
इकडे साल्हेरच्या वेढ्याची वार्ता समजताच महाराजांनी त्वरित पत्रे पाठवून मुघल मुलुखातून प्रतापराव आणि कोकणातून मोरोपंत यांना ‘दुतर्फा चालून घेऊन गनिमास मारून गर्दीस मेळविणे’ अशी आज्ञा केली. मोरोपंत आणि प्रतापराव यांनी प्रचंड सैन्यानिशी साल्हेरला वेढा घालून बसलेल्या मुघल फौजेवर आकस्मिक हल्ला चढवला. एकीकडून प्रतापरावांचे घोडदळ आणि दुसरीकडून मोरोपंतांचे पायदळ याच्या कचाट्यात मुघल सैन्य सापडले. तुंबळ युद्ध झाले (जाने.-फेब्रु. १६७२). याबाबत सभासद बखरीतील वर्णन अतिशय बोलके आहे,
चार प्रहर दिवस युद्ध जहालें. मोगल, पठाण, रजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती उंटे आराबा घालून युद्ध जहालें. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोस औरसचौरस आपलें व परकें माणूस दिसत नव्हतें. हत्ती रणास आले. दुतर्फा दाहा हजार माणूस मुर्दा जहाले. घोडी, उंट, हती यांस गणना नाही. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जहाले त्यामध्ये रुतों लागले. असा कर्दम जाहला.
या युद्धात स्वतः पेशवे मोरोपंत आणि सरनौबत प्रतापराव यांनी पराक्रमाची शर्थ करत शत्रुस पळता भुई थोडी करून सोडले. शिवाय आनंदराव, व्यंकोजी दत्तो, रुपाजी भोसले, शिदोजी निंबाळकर, खंडोजी, संताजी व गोंदजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ अशा कित्येकांनी तलवार गाजविली. परंतु याच वेळी सुर्याजी काकडे या महाराजांच्या लहानपणीच्या सवंगड्यास गोळा लागून वीरमरण आले.
सुर्याजीचे वर्णन करताना सभासदाने म्हटले आहे की, ‘सुर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे. भारतीं जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिमेचा असा शूर पडला.’
साल्हेरला मुघलांचा पूर्ण पराभव झाला. इख्लासखान, मुहकमसिंह, द्वारकोजी (दारकोजी) भोसले असे अनेक नामांकित मुघल सरदार कैद झाले. एक दोन हजार हशम वगळता मराठ्यांनी बाकी सारे सैन्य गारद केले. हत्ती, घोडे, उंट, जडजवाहीर, इ. भरपूर मालमत्ता मराठ्यांना प्राप्त झाली.
या संदर्भात जेधे शकावलीतील उल्लेख आहे की, ‘माघ मासी मोरोपंती हशम घेऊन सालेरीची माचीचा वेढा मारिला, उपराला केला. प्रतापराव व आनंदराव फौजेनिसी जाऊन बहलोलखान धरिला, मोहोकमसिंह व दारकोजी भोसले धरिले. हत्ती अकरा व घोडी सतरा से पाडाव केली.’
साल्हेरच्या युद्धाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठ्यांनी हे युद्ध नेहमीप्रमाणे डोंगराळ प्रदेशात न लढता उघड्या मैदानात लढले. त्यामुळे मुघलांच्या प्रचंड फौजेचा सामना आपण खुल्या मैदानातही करू शकतो, हा आत्मविश्वास बळावला. गतिक्षमता (mobility), विस्मयकारकता आणि बळाचे केंद्रीकरण (concentration of force) ही युद्धनीतीमधील काही मुलभूत तत्वे आपल्याला साल्हेरच्या युद्धात प्रकर्षाने अनुभवायला मिळतात. साल्हेरला वेढा घातल्याचे समजताच महाराजांनी प्रतापराव व मोरोपंत यांना त्वरेने रवाना केले. तसेच दुसरीकडे रामाजी पांगेरांच्या पायदळाकडून मार खाल्लेल्या संतप्त दिलेरखानाने पुण्यावर हल्ला चढवत वारेमाप कत्तल चालविली; तेव्हाही महाराजांनी त्वरित विविध किल्ल्यांवरील सैन्य एकत्र करून दिलेरवर हल्ल्याची तयारी केली. अर्थात सैन्याच्या जलद हालचाली करून गरज पडेल तिथे सैन्यबळ एकवटणे यात मराठा सैन्याची गतिक्षमता दिसून येते. तसेच कोकणातून साल्हेरला जाताना मोरोपंतांनी सह्याद्रीचा खूबीने वापर करत मुघलांना आपल्या फौजेचा थांगपत्ता लागू दिला नाही. त्यामुळेच योग्य संधी साधून मोरोपंतांचे पायदळ आणि प्रतापरावांचे घोडदळ यांनी एकत्रितपणे हल्ला चढवत साल्हेरच्या युद्धभूमीवर निर्णायक विजय मिळवला आणि साल्हेरवर फडकणारा भगवा अबाधित राखला....
©️ - अदिती अभिजीत कुलकर्णी. ✍️🏻
संदर्भ:
१. शककर्ते शिवराय (खंड २) – विजयराव देशमुख
२. मराठी रियासत (खंड १) – गो. स. सरदेसाई
३. सभासद बखर
४. शिवचरित्र प्रदीप
५. Shivaji His Life and Times – G.B. Mehendale
६. जयतु शिवाजी, जयतु शिवाजी – मे. ज. शशिकांत पित्रे
छायाचित्रे:
1.राजा शिवछत्रपती ग्रंथातील दीनानाथ दलाल यांच्या मूळ चित्राची AI वरून stylized version.
2. Wikimedia Commons.
Comments
Post a Comment