मध्यांन्हीचा भास्कर पाहवेना !
मुठीत वैश्र्वानर बांधवेना
तैसे शिवाजी नृप जिंकवेना !!
सभासद बखरीतील या ओळी वाचल्या की डोळ्यासमोर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या एकेक कथा उभ्या राहतात...
प्रतापगडाचा तो पायथा, तो लाल महाल, सुरत शहर,
आग्र्याचा तो दरबार, ती पेटाऱ्यातून सुटका आणि मग ..... मग राज्याभिषेकाचा तो सुवर्ण क्षण.
हा दिवस म्हणजे महाराष्ट्रातील रयतेसाठी सर्वात मोठा सण. राज्याभिषेक ही स्वराज्यातील महत्वाची घटना होती हे आपण जाणतोच. पण त्या वेळी अजून काही लहान मोठ्या गोष्टी घडल्या ज्यांचा उल्लेख एकेका वाक्यात होतो. या घटनांचे महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न आज आपण करूया...
नमस्कार ,
आज ज्येष्ठ शु. १३ ..... ३४६ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे श्री नृपशालिवाहन शके १५९६ , आनंदनाम संवत्सरे , ज्येष्ठ शु. १३ , शनिवार ,सूर्योदयापूर्वी तीन घटका , उषःकाली शुभ मुहूर्तावर शिवाजी महाराज क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले.
राज्याभिषेकामुळे मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण होऊन मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे ही घटना महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासातही महत्त्वपूर्ण आहे.
या नवीन मराठी साम्राज्याला पूर्णत्व येऊन सार्वभौमत्व सिद्ध व्हावे यासाठी महाराजांनी सुवर्ण व तांब्याची नाणी पाडली. त्यावर ' राजा शिवछत्रपती ' ही अक्षरे कोरली.
राज्याभिषेक सोहोळ्याच्या निमित्ताने महाराजांनी नवीन शक सुरू केले - राज्याभिषेक शक. यास त्यांनी स्वतःचे नाव दिले नाही. ही घटना लोकांच्या स्मरणात राहावी हा या मागचा महाराजांचा हेतु व मोठेपणा होता.
भारतावर मुघल व अनेक लोकांची आक्रमणे झाली. त्यांनी त्यांच्या सोबत आपली भाषा व संस्कृती इथे आणली. त्याचा प्रभाव भारतीय भाषांवर झाला. मराठी मध्ये देखील बऱ्याच फार्सी शब्दांचा वापर केला जाऊ लागला. याचा परिणाम रयतेच्या विचारसरणीवर दिसतो. म्हणूनच लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल व भाषे विषयी स्वाभिमान वाटावा म्हणून महाराजांनी ' राज्यव्यवहार कोश ' तयार करून घेतला. या ग्रंथामध्ये फार्सी, अरबी शब्दांसाठी पर्यायी संस्कृत शब्द दिले आहेत.
उदाहरणार्थ ,
तख्त ( मूळ फार्सी ) त्यास पर्यायी शब्द सिंहासन,
साहेब ( मूळ अरबी ) - स्वामी ,
हेजीब ( मूळ अरबी) - दूत,
शिकस्त ( मूळ फार्सी ) - पराभव,
किल्ला ( मूळ अरबी ) - दुर्ग ,
गनिम ( मूळ अरबी ) - वैरी , ई.
आपल्या संस्कृतीची जोपासना तसेच त्याबद्दलची शिवाजी महाराजांची भावना ही आपल्याला त्यांच्या राज्यकारभरातून सुद्धा दिसते. पत्रव्यवहार, लेखनाचे नियम व वापरले जाणारे मायने त्यांनी नव्याने घालून दिले. गडांनाही संस्कृत नावे दिली. अष्टप्रधान मंडळातील प्रधानांच्या पदांसाठी महाराजांनी संस्कृत शब्द प्रचारात आणले. जसे,
पेशवा चे प्रधान,
सरनोबत चे सरसेनापती,
डबीर चे सुमंत,
सूरनीस चे सचिव,
मुजुमदार चे अमात्य, ई.
आजकाल आपण हिंदु कालगणनेचा फार वापर करत नाही. सोयीसाठी इंग्रजी तारखांचा उपयोग केला जातो. त्यामुळे राज्याभिषेक या सारख्या महत्वाच्या ऐतिहासिक घटना सुद्धा इंग्रजी तारखे प्रमाणे लक्षात ठेवणे सोयीस्कर वाटते. राज्याभिषेक समयी इंग्रज वापरत असलेल्या जुलियन कालगणनेनुसार तारीख होती - ६ जून १६७४ .
परंतु नंतर इंग्रजांनी ग्रेेेगोरियन कालगणना स्विकारली जी आज आपणही वापरतो. पण जुुुलियन व ग्रेगोरियन कालगणनेमध्ये फरक असल्याने आता राज्यभिषक तारीख असली पाहिजे - १६ जून १६७४.
म्हणजे बघायला गेले तर या दोन वेगळ्या पद्धतीमुळे नक्की कोणती इंग्रजी तारीख ग्राह्य धरावी हा प्रश्नच आहे.
याबद्दल विचार केला तर प्रथम म्हणजे राज्याभिषेक या घटनेचे प्रयोजन स्वतंत्र राज्य स्थापने बरोबरच सामान्य जनतेेच्या मनात आपल्या संस्कृृतीचा अभिमान जागा करून स्वावलंबी बनवणे हा होता. त्यामुळे शिवाजी महाराजांची ही भावना आपण लक्षात ठेेेेवली पाहिजे व त्यानुसार राज्याभिषेेक सोहोळा हा सण इतर कोणत्याही सणासारखा तिथीप्रमाणे साजरा करावा.
कारण तेव्हाच आपण स्वतःला खरे शिवप्रेमी व खरे शिवभक्त म्हणू शकतो.....
Jhakas,mustach, khup sundar,
ReplyDeletekeep it up👍👍
फारच छान
ReplyDeleteअसाच अभ्यास सुरू ठेव
इतिहासाचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास फार गरजेचा आहे
ReplyDelete