#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची
“साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....”
आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते.
व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज!
अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख ठिकाण व व्यापारी केंद्र. मध्ययुगात सुद्धा इथून नदीमार्गे चालणार्या व्यापारासाठी ते प्रसिद्ध होते. समुद्रामार्गे आलेला व्यापारी माल छोट्या बोटींवर लादून राजापुरला आणला जात असे. तिथून अणुस्कुरा घाटातून तो देशावर व कर्नाटक प्रांतात पोहचवला जाई. साहाजिकच, एतद्देशीय व्यापारांइतकेच परदेशी लोकांनाही हे ठिकाण आकर्षित करी. सन १६३८ मध्ये सर विलियम कोर्टेन यांची व्यापारी संस्था व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांनी मिळून येथे वखार उघडली. येथील इंग्रजांशी शिवाजी राजांचा पहिला संबंध सन १६५९ मध्ये आला. अफझलखान वधानंतर खानाच्या मालकीची तीन गलबते व आदिलशाही कोकणाचा मुलुख ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी आपल्या दोरोजी नावाच्या सरदाराला पाठवले. ही गलबते इंग्रजांच्या ताब्यात होती. मराठ्यांना ते कबजा देईना. त्यामुळे दोरोजींनी इंग्रजांचा एक दलाल - वेलजी व फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकार्याला कैद करून खारेपाटणच्या किल्ल्यावर ठेवले. पुढे दंडा राजपुरी घेण्यासाठी मदत करू अशी कबुली देऊन इंग्रजांनी महाराजांशी मैत्रीचा करार केला. परंतु महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेत हे पाहून इंग्रजांच्या ‘व्यापारी’ उद्योगांना उधाण आले. त्या नादातच, या वखारवाल्यांनी महाराजांशी केलेला मैत्रीचा करार डावलून सिद्दी जोहरला युद्धसामग्री पुरवण्याचा घाट घातला. अशा या व्यापार्यांना वेळीच ठिकाठिक करण्याचा मनसुबा महाराजांनी इसवी सन १६६१ च्या कोकणावरील स्वारीत पक्का केला.
एका डच अहवालानुसार, एक हजार घोडदळ व तीन हजार पायदळासह महाराज राजापुरात दाखल झाले. नगरातील परकीय व्यापारी व धनिक यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली. शिवभारतातील वर्णनानुसार, पंचक्रोशीतील पावस, कशेळी, साठवली, खारेपाटण, इ. गावांनी सुद्धा खंडणी जमा केली. इंग्रजांच्या वखारीला तर खणत्या लागल्या. सोने, रुपे, पितळ, मोती, माणके, मौल्यवान सामान, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या वस्त्रांचे ठाण, इ. बरीच संपत्ती हस्तगत झाली. यावेळी, हेन्री रेव्हिंगटन, रॅडॉल्फ टेलर, रॉबर्ट फेरंड, रिचर्ड नॅपियर, रिचर्ड टेलर, फिलिप गिफर्ड, एक सर्जन व विलियम मिंघम अशा एकूण आठ इंग्रजांना कैद करण्यात आले. या कैद्यांना वासोटा व पुढे सोनगडावर ठेवण्यात आले होते. ही हकिकत पुढे २८ जानेवारी १६६४ रोजी सुरतेहून लिहिलेल्या एका इंग्रज पत्रात देखील वाचायला मिळते.
अशा या इतिहासप्रसिद्ध इंग्रज वखारीचे अवशेष आजही राजापुर मध्ये अर्जुना नदीच्या किनारी अस्तित्वात आहेत. राजापूर बस स्थानकाच्या जवळून धुतपापेश्वर मंदिराकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल ओलांडून डावीकडे वळले की रस्त्यापासून जवळच हे अवशेष आहेत. ‘इंग्रज वखार’ किंवा ‘राजापूर गढी’ या नावे हे ठिकाण ओळखले जाते. सद्यस्थितीत इथे इंग्रजांनी बांधलेल्या खोल्या, जोते, विहिर व नदीकडील बाजूला गढीच्या तटाचा काही भाग व दोन बुरुज दिसतात. आम्ही गेलो त्यावेळी (जाने. २०२६) वखारीतील ‘कचेरी’च्या इमारतीच्या डागडुजीचे व नुतनीकरणाचे काम सुरू होते.
राजापूरची ही वखार म्हणजे इंग्रजांच्या भारतातील साम्राज्यवादी विस्ताराची नांदीच होय! परंतु, टोपिकरांच्या या छुप्या धोरणांना लगाम घालण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या सावध व चाणाक्ष धोरणाचेही ते द्योतक आहे. म्हणूनच अशा या महत्त्वपूर्ण वास्तूचे जतन होत आहे, ही बाब नक्कीच सुखावणारी आहे!
© - अदिती कुलकर्णी.
संदर्भ:
१. आज्ञापत्र – रामचंद्र पंत अमात्य.
२. कविंद्र परमानंदकृत श्रीशिवभारत
३. English Records on Shivaji, Vol. 1
४. Ratnagiri District Gazetteer
५. Shivaji : His Life and Times – Gajanan Bhaskar Mehendale.
Comments
Post a Comment