Skip to main content

खारेपाटण येथील पुरातन किल्ला

#सफर_ तळकोकणच्या_इतिहासाची 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार समजले जाणारे खारेपाटण, आजच्या मुंबई - गोवा महामार्गालगत वसलेले एक शांत व रम्य खेडे. परंतु, एके काळी हेच गाव व्यापारी जहाजांच्या येण्या-जाण्याने गजबजलेले असायचे ! 
कोकणात पुर्वापार व्यापार व वाहतूकीसाठी इथल्या नद्यांचा वापर होत आला आहे. सहाजिकच, या नद्यांच्या किनार्‍याने व त्यांच्या मुखाशी अनेक महत्त्वाची खेडी, बंदरे व व्यापारी केंद्रे उदयास आली. ‘खारेपाटण’ या गावची कथा सुद्धा अशीच काहीशी! 


वाघोटन नदीच्या किनार्‍यावर हे गाव वसलेले आहे. हिंदू, मुसलमान, जैन व ज्यू लोकांची सुद्धा येथे वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. खारेपाटण याचे मूळ प्राचीन नाव 'बळीपट्टण'. दक्षिण व उत्तर कोकणच्या शिलाहारांच्या लेखातही या नावे खारेपाटणचा उल्लेख सापडतो. शिलाहारांच्या दक्षिण कोकण शाखेतील 'धम्मियार' या राजाने येथे दुर्ग व शहर वसवल्याची नोंद त्याच वंशातील 'रट्टराज' याच्या शिलालेखात आढळते. त्या काळापसूनच, खारेपाटण हे एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पुढे, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीज प्रवासी बारबोसा याने ‘अरापत्रा’ म्हणून याचा उल्लेख केला आहे. या भागातील उत्तम बंदरांमध्ये त्याची गणना होत असे. मोठ्यातली मोठी जहाजे नदीमार्गे इथपर्यंत येऊ शकत होती. तसेच बावडा व फोंडाघाट मार्गे हे ठिकाण देशाशी जोडले असल्याने सुद्धा ते सोयीचे मानले जाई. 


शिवकाळात याच वाघोटन नदीच्या मुखाशी असलेल्या ‘घेरिया’ या गडाचे रुपांतर शिवरायांनी बळकट अशा ‘विजयदुर्गा’त केले. एक आरमारी तळ म्हणून विजयदुर्ग उदयास आला. परंतु त्यापासून आत, नदीकिनारी असलेल्या खारेपाटणच्या या किल्ल्याचा वापर टेहाळणी व वाघोटन किनार्‍यावरील ठाणे म्हणून होत असे. अफजलखान वधानंतर उद्भवलेल्या ‘जहाज प्रकरणात’ सन १६६० साली मराठ्यांनी अटक केलेल्या फिलिप गिफर्ड या इंग्रजाला व त्याच्या दलालाला याच किल्ल्यावर कैदेत ठेवले होते. 
सध्या अवशेष रूपाने हा किल्ला अस्तित्वात आहे. खारेपाटणच्या बाजारपेठेतून या किल्ल्याकडे वाट जाते. गडावर सुस्थितीत असलेली एकमेव वास्तू म्हणजे येथील दुर्गादेवीचे मंदिर. मंदिराचे नूतनीकरण झाले आहे. साधारण एकरापेक्षा जास्त विस्तार असलेल्या या गडाचे बुरूज व तटाच्या भिंती इसवी सन १८५० मध्ये वाघोटनच्या किनारी बंदर व माल उतरवण्याची जागा दुरुस्त करण्यासाठी उतरवण्यात आल्या. त्यातून उरलेल्या बुरूजाचे अवशेष सध्या पाहायला मिळतात. गडाचा मुख्य दिंडी दरवाजा, त्याच्या आजूबाजूची तटबंदी व बुरूज माथ्यावर भगवा ध्वज सांभाळत गतवैभवाची आठवण करून देत उभा आहे. त्याशिवाय काही अज्ञात समाध्या, स्मृतीशिळा, ‘भुयार’, ‘सुळाचा दगड’, इ. अवशेष बघायला मिळतात. येथील ‘भुयार’ म्हणून दाखवण्यात येणार्‍या जागेची बरीच पडझड झाली आहे. ‘गडावरील पागेला नदीपर्यंत जाण्यासाठीचे हे भुयार आहे’ असे येथील स्थानिक सांगतात. मात्र तथाकथित ‘भुयारा’ची पूर्ण साफसफाई झालेली नाही. त्यामुळे, ठोसपणे सांगता येत नसले तरी त्याच्या एकूण रचनेवरून, ते भुयार नसून घोडेबाव असावी असे वाटते. गडावरून  वाघोटन नदी, खारेपाटण गाव व सभोवतालचा परिसर न्याहाळता येतो. त्यातून गडाचे महत्त्व लक्षात येते. 


या व्यतिरिक्त, खारेपाटण गावात श्री कपिलेश्वर मंदिरातील शिलाहारकालीन सुर्यमूर्ती व विष्णुमुर्ती अतिशय प्रेक्षणीय आहे. मंदिराबाहेरील नंदी व इतर पुरावशेष सुद्धा आपले लक्ष वेधून घेतात. तसेच नदीच्या डोहात सापडलेली एक जैन मूर्ती, जुन्या मशीदी, कबरी, इ. सुद्धा गावात आहे. आधुनिक काळात, सन १८६८ ते १८७५ या दरम्यान खारेपाटण देवगड तालुक्याचे मुख्य ठिकाण होते. पुढे ते देवगडला हलवण्यात आले. त्यावरून, प्राचीन काळापासून अगदी नजीकच्या काळापर्यंत खारेपाटण हे या भागातील व्यापार, दळण-वळण, इ. च्या दृष्टीने महत्त्वाचे होते. विविध कालखंडातील व विविध समुदायांच्या पाउलखुणा या गावाने आजही जपल्या आहेत. त्या पाहण्यासाठी येथे यायलाच हवे. 

© - अदिती कुलकर्णी. 


संदर्भ: 
1. Corpus Inscriptionum Indicarum, Vol. VI – (ed.) V.V. Mirashi. 
2. Ratnagiri District Gazetteer   

Comments

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...