Skip to main content

शंभू राजांच्या नजरेतून शिवराज्याभिषेकाचे वर्णन

‘या युगी पृथ्वीवर सर्व म्लेंच्छ बादशाह. मराठा पातशाह येवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काहीं सामान्य झाली नाही.’ 

सभासद बखरीत शिवराज्याभिषेकाचे हे अजरामर वर्णन सर्वश्रुत आहे. राजाभिषेकाच्या या अभुतपूर्व सोहळ्याचे वर्णन अनेकांनी आपापल्या परीने करून ठेवले आहे. यातील काहींनी ऐकीव माहितीच्या आधारे वर्णन लिहिले तर अनेकांनी तो सोहळा प्रत्यक्ष याची देहि, याची डोळा अनुभवला.

त्यामध्ये कृष्णाजी अनंत सभासदासारखे बखरकार, निश्चलपुरी गोसावी सारखे साधू, हेन्‍री ऑक्झेंडन सारखे टोपीकर, इ. अनेकांचा समावेश आहे. यापैकी एक अतिशय महत्त्वाचे नाव म्हणजे युवराज संभाजी राजे.
राज्याभिषेकप्रसंगी, संभाजी राजांना देखील युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला होता. राज्याभिषेक ही घटना केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष सिंहासनारोहणाच्या आधी व नंतरही अनेक दिवस हा सोहळा सुरू होता. शिवकालात रायगडाचे वास्तुवैभव, तुलादान व अन्य विधी, तसेच राज्याभिषेकाची एकूणच व्याप्ती व स्वरूप याचे संक्षिप्त परंतु गौरवपूर्ण वर्णन युवराजांनी आपल्या ‘बुधभुषण’ या राजनीतीपर ग्रंथात केलेले आहे. राजाभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने ते अनेकार्थाने महत्त्वपूर्ण ठरते.

शंभू राजांनी ग्रंथाच्या सुरुवातीला आपल्या कुळाचा (अर्थात आपल्या पराक्रमी अजोबा व वडीलांचा) इतिहास अगदी थोडक्यात मांडला आहे. संभाजी राजे आपल्या वडीलांना (शिवाजी महाराजांना) स्वयं भगवान विष्णूचा अवतार म्हणतात. मुलुखाच्या संरक्षणासाठी कर्नाटक देशापासून बागलाण पर्यंत आणि कृष्णेच्या तीरापासून पश्चिम समुद्रापर्यंत सह्याद्रीच्या शिखरांवर अनेक दुर्ग निर्माण करून शिवाजी महाराज रायगडी विराजमान झाले असे त्यात म्हटले आहे. पुढे राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना शंभू राजे म्हणतात,     

“आपूर्वाचलपश्विमाम्बुधिमथाप्यासेतुशीताचलं
निर्जित्यावनिमण्डलं च करदीकृत्याखिलान्भूमिपान् ।
श्रौतं धर्ममवाप्य सद्भिरुदितं राजाभिषेके परं
छत्राद्यैर्नृपलक्षणेरनुदिनं सिंहासने राजते ॥ १२ ॥
नानादेशसमागतान् द्विजवरान्येनाभिषेकोत्सवे ।
संतर्प्यातुलतोलितैर्बहुधनैर्वस्त्रैर्गजैर्वाजिभिः ।
चन्द्रप्रेरितचान्द्रकेव विमला गेया बुधैर्बन्दिभिः
कीर्तिः सर्वदिगन्तरेषु जयिना विस्तारिता भूभृता ॥ १३ ॥
सोयं यस्य गडो नरेन्द्रवहितैः प्रासादहर्म्येरट्टै (?)
म्यरापपा (रम्यैरापण?) चत्वरैश्व परितः पूर्णेः सरोभिर्नवेः ।
विद्वद्वैदिकवैद्यवर्यगणकैराद्यैश्व सन्मन्त्रिभिः
सैन्यैश्वापि चतुर्विधैरगणितैर्भाति प्रतापान्वितैः ॥ १४ ॥"

अर्थात, ‘त्यांनी (शिवाजी महाराजांनी) पूर्वेकडील पर्वतापासून पश्चिमेकडील महासागरापर्यंत, आणि दक्षिणेत सेतुपासून हिमालयापर्यंत (आसेतुहिमाचल) संपूर्ण पृथ्वी जिंकली आणि पृथ्वीवरील सर्व शासकांना कर आकारले. राज्याभिषेकाच्या वेळी संतांनी/ सत्पुरूषांनी व श्रुतींमध्ये सांगितलेली धार्मिक तत्त्वे प्राप्त करून, ते छत्रचामरे आणि इतर शुभ वैशिष्ट्यांसह दिवसेंदिवस सिंहासनावर शोभून दिसतात. राज्याभिषेकाच्या उत्सवानिमित्त विविध देशांतून आलेल्या सर्वोत्तम ब्राह्मणांनी अभिषेक समारंभाला हजेरी लावली. त्याने (शिवाजी महाराजांनी) त्यांना अतुलनीय संपत्ती, कपडे, हत्ती आणि घोडे देऊन तृप्त केले. अशा प्रकारे, साक्षात देवांनी गावी अशी त्यांची (महाराजांची) कीर्ती दिगंतराला पोहचली, जिची शुध्दता चंद्राच्या तेजाची आठवण करून देते. अशा या शिवाजी राजाचा गड (रायगड) येथे राजवाडे व भव्य प्रासाद, सुबक कमानी आणि सुंदर बाजारपेठा तसेच सभोवताली पाण्याने भरलेले तलाव असून विद्वान, वैदिक, पुजारी, वैद्य आणि ज्योतिषी, तसेच प्रामाणिक वंशपरंपरागत मंत्री आणि चार प्रकारच्या (चतुरंग) असंख्य शूर सैन्यासह शोभून दिसतो.’   

अशा प्रकारे, स्वराज्याचा विस्तार, शत्रू राज्यावर महाराजांची असलेली दहशत, महाराजांच्या दरबारात सज्जन-विद्वानांना असलेले मानाचे स्थान, राज्याभिषेकप्रसंगी केलेला विपुल दानधर्म, गडावर निर्मिलेल्या विविध वास्तु अशा अनेक गोष्टींचे तपशील उपरोक्त श्लोकांतून वाचायला मिळतात. त्यामुळेच राज्याभिषेकाचे हे समकालीन व प्रत्यक्षदर्शी वर्णन महत्त्वपूर्ण ठरते.  
 
©️ - अदिती कुलकर्णी. ✍️🏻
 

संदर्भ:
१. बुधभुषणम् (The Budhabhushana of King Shambhu) – संपा. ह. दा. वेळणकर.
२. सभासद बखर.  

चित्र: दीनानाथ दलाल यांच्या मूळ चित्रावरून आईने काढले आहे. 
 

Comments

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...