Skip to main content

शिवपुण्यतिथी 🌸

'छत्रपती शिवाजी महाराज' हे तीन शब्द अक्षरशः मंतरलेले आहेत. महाराजांचे अवघे आयुष्य - अवघे शिवभारत केवळ पन्नास वर्षांचे! पण त्याची व्याप्ती, त्याचे विविध पैलू आजही सुसंगत वाटणारे. महाराष्ट्राला तर या नावाने मोहिनी घातली आहे. परंतु महाराष्ट्राबाहेरही कविराज भूषण, छत्रसाल यासारख्या कित्येक लोकांना शिवचरित्राने भारावून टाकले. भूषण आपल्या एका छंदात म्हणतात, 

" सिव चरित्र लखी यों भयो कबि भूषन के चित्त |
भाँति भाँति भूषनिनि सों भूषित करौ कबित्त ||"

अर्थात 'शिवरायांचे चरित्र पाहून भूषणाचे कवीमन विलोभले. भूषण म्हणतो काव्य अशाच विषयावर (शिवचरित्रावर) करावेसे वाटते जेथे विविध अलंकार शोभून दिसतात!" 
 
एतद्देशीयांच्या बरोबरीने परकियांनाही महाराजांच्या पराक्रमाचा व एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अचंबा वाटल्याशिवाय राहिला नाही. 
जितक्या वेळा वाचावे, ऐकावे, बोलावे तितक्या वेळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू नव्याने उलगडत जातो. एक उत्कृष्ट योद्धा, प्रजेच्या सुखासाठी कटिबद्ध असा दक्ष शासक, सावध आणि मुत्सद्दी राजनीतितज्ञ, उत्तम दुर्गस्थापत्यकार या आणि अशा कित्येक गुणांमुळे समर्थांनी त्यांना ' जाणता राजा ' म्हटले आहे.
इस्लामी सत्तांना आव्हान देत हिंदु अस्मिता आणि हिंदु संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचे जे अद्वितीय कार्य त्यांनी केले त्यासाठी दस्तुरखुद्द संभाजी राजे आपल्या वडिलांचा गौरवपूर्ण उल्लेख ' म्लेंच्छक्षयदीक्षित' असा करतात.

समर्थांनी महाराजांना लिहिलेल्या पत्रात शिवकल्याणराजा, जाणता राजा, श्रीमंतयोगी अशी कितीतरी विशेषणे त्यांच्यासाठी वापरली आहेत. पण त्यातही 
"आचारशीळ, विचारशीळ | दानशीळ, धर्मशीळ 
सर्वज्ञपणे सुशील | सकळां ठायी "
या ओळींमधील "सर्वज्ञपणे सुशील" हे त्यांच्या अद्वितीय चारित्र्याबद्दल खूप काही सांगून जाते. किंबहुना महाराजांचे कालातीत वेगळेपण या दोनच शब्दात उमटले आहे.  

खऱ्या अर्थाने, सभासदाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, "राजा साक्षात केवळ अवतारीच..." 
त्यांच्या कार्याची व्याप्ती म्हणजे सह्याद्री इतकी. पण तरीही महाराजांनी दिलेल्या ideals पैकी एखादे तत्त्व तरी पूर्णपणे आत्मसात करता यावे असे वाटतेच. यासाठी शिवचरित्राचे वाचन, श्रवण जे काही करते त्यात थोडेफार उमगलेले तुटक्या मोडक्या शब्दात मांडण्याचा हा एक प्रयत्न. 
बहुत काय लिहिणे?

©️ - अदिती कुलकर्णी. ✍️🏻

 








Comments

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...