Skip to main content

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड!

रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे. 

भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असून मारुतीरायाच्या गालावर झुपकेदार मिशा आणि हातात खंजीर बघायला मिळते. दोन दरवाजे ओलांडून झाडीने आच्छादलेल्या वाटेने आपण तिसऱ्या दरवाज्याशी पोहचतो. इथली प्रवेशद्वाराची कमान आता शिल्लक नाही.
तिसऱ्या दरवाज्यातून आत गेल्यावर लगेचच उजवीकडे एक तोफ आणि मागे एक लहानसा तलाव आहे. थोडं पुढे गेल्यावर डावीकडे अजून एक मोठी तोफ आहे. या तोफेवर मुकुटाचे चिन्ह ( royal crown ) आणि त्याखाली इंग्रजी ' P ' हे अक्षर तसेच खाली 17-2-0 हे अंक कोरलेले आहेत. एकूणच या गडावर विविध भागात विखुरलेल्या १६ तोफा पाहायला मिळाल्या. म्हणूनच ' अनेक तोफा असलेला गड ' अशीही या गडाची एक ओळख सांगता येईल.
पायवाटेने तसेच पुढे चालत गेल्यावर काहीसं उंचावर असलेले गडदेवता झोलाई देवीचे मंदिर दिसते. मंदिरासमोर नव्याने बांधलेली दीपमाळ, तुळशी वृंदावन आणि बगाडाचा खांब आहे. जवळच एकीकडे चार व थोडं पुढे अजून दोन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या आवारातच एक सतिशिळा व जीर्ण अवस्थेतील बहुदा देवीची एक मूर्ती आहे. अजून दोन मूर्ती देवळाच्या मागील बाजूस आहेत. झोलाई देवीच्या मंदिरातही अनेक जुन्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात. गाभाऱ्यात श्री वाघजाई, श्री भैरी आणि श्री झोलाई विराजमान आहेत. गाभाऱ्यातील एका खांबावर व्याल / शरभाचे शिल्प आहे. 

मंदिराच्या जवळच दोन बांधीव तलाव आणि लागूनच एक प्रशस्त चौबुर्जी वाडा (गढी) आहे. वाड्यात आत गेल्यावर बांधकामाचे जोते तसेच चुन्याचा घाणा दिसतो. वाड्याच्या एका बुरुजावर तीन तोफा पाहायला मिळतात. 
बाहेर येऊन वाडा उजवीकडे ठेवत पुढे चालत गेल्यावर उजवीकडे कोठार लागते. कोठराला दोन प्रवेशद्वारे असून दोन्ही दरवाज्यांच्या वरच्या बाजूला गणेशपट्टी व खाली कीर्तीमुख आहेत. कोठारापासून पुढे गडाचे बऱ्यापैकी विस्तीर्ण असे पठार आहे. थोडं पायवाटेने थोडं कातळावरून तसेच चालत गेल्यास गडापासून जरा सुटावलेली टेकडी आहे. इथे काहीशा खोलगट भागात अनेक समाध्या / समाधी सदृश रचलेले दगड आहेत. टेकडीवर चढून गेल्यास पूर्वेकडे एक शिवलिंग आणि नंदी देखील बघायला मिळतो. तिथवर जाताही येते, मात्र सगळीकडे गवत माजलेले असल्याने काही वाटा त्यात गडप झाल्या होत्या. गडाच्या पूर्वेकडील बाजूलाच एक खांबटाके असल्याचेही वाचले होते, मात्र वाढलेलं गवत आणि ऑक्टोबर महिना असूनही पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी साचलेला चिखल व पाणी यामुळे तोही मोह टाळावा लागला. 
अशा प्रकारे गडावरचे काही अवशेष पाहायचे राहून गेले असले तरी गडावरून दिसणाऱ्या दृश्याने पावसाळ्यानंतरच्या या पहिल्याच गडवारीचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले. सह्याद्रीची आभाळाला गवसणी घालणारे उत्तुंग शिखरे, आकाशात कापसासारखे विखुरलेले ढग, खाली जावळीचे घनदाट जंगल, त्यातून नागमोडी वळणं घेत वाहणारी जगबुडी आणि तिच्या आसऱ्याने बहरलेली छोटी छोटी खेडी !
सह्याद्रीचे असे हे मनमोहक रूप डोळ्यात पुरेपूर साठवून शेवटी गडाला रामराम ठोकला - पण पुन्हा इथे येण्याची खूणगाठ बांधूनच !...

©️ - अदिती कुलकर्णी. ✍🏻


संदर्भ : 
रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा - डॉ. सचिन जोशी.


Comments

  1. खूप विस्तृत आणि माहितीपुर्ण लेख. तुझ्याबरोबर भटकंतीचा अनुभव मिळाला. कधी आणि कशी गेली होतीस.

    ReplyDelete
  2. धन्यवाद 😊🙏🏻 मित्र मैत्रिणींसोबत गेले होते.

    ReplyDelete
  3. छान सुरेख लेख सोप्या आणि सुटसुटीत बाबी. माडल्यात 👏🏻👌🏻👌🏻👍🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...