Skip to main content

शंभूछत्रपती आणि सेतु बांधणी

नुकताच अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहोळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभू श्री रामाच्या जीवनातील अद्भुत प्रसंग आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यातीलच एक म्हणजे सेतू बांधणी ! 

लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी श्री रामाने वानर सेनेच्या मदतीने केलेल्या सेतू बांधणीची कथा आपण सर्वांनी अनेकदा ऐकलेली आहे. पण असाच एक सेतू बांधणीचा प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांनी देखील केला होता. तीच हकीकत थोडक्यात - 


जंजिरेकर सिद्दी हा स्वराज्याला कायम डाचणारा शत्रू. सभासदाने त्याचे वर्णन ' घरात जैसा उंदीर तैसा ( हा ) शत्रू ' या शब्दात केलें आहे. छत्रपती शिवरायांनी अनेकदा प्रयत्न करूनही दुर्दैवाने त्यांना सिद्दीला मुळापासून उखडून टाकण्यात यश आले नाही. इ. स. १६८० - ८१ च्या सुमारासही मुंबईच्या इंग्रजांच्या आश्रयाने स्वराज्याच्या किनारपट्टीवरील प्रदेशावर त्याचे छापे एकसारखे सुरू होते. ही ब्याद एकदाचीच उपटून वडिलांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे आणि रयतेचे होणारे हाल थांबवावे या हेतूने छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दिविरुद्ध जोरदार मोहीम उघडली. त्याचे नेतृत्व त्यांनी स्वतःकडे घेतले. 


सिद्दीचे समूळ उच्चाटन करायचे तर जंजिरा जिंकणे आवश्यक होते. त्यासाठी संभाजी महाराजांनी प्रथम भेदनीतीचा अवलंब करत कोंडाजी फर्जंद यांना गुप्तपणे रवाना केले. कोंडाजींनी जंजिऱ्यावरील दारुखाना उडवून देण्याची योजना आखली होती. मात्र ऐनवेळी हा डाव उघडकीस आला आणि सिद्द्याने कोंडाजींचा शिरच्छेद करविला. या घटनेने संतापून शंभूछत्रपतींनी काहीही करून जंजिरा जिंकण्याचा निर्धार केला. जंजिरा जिंकून दिल्यास दादाजी रघुनाथ प्रभू देशपांडे यांस संभाजी महाराजांनी ' अष्टप्रधान मंडळात पद देऊ ' असे सांगितले होते यावरून या मोहिमेची तीव्रता लक्षात येईल. 

तोफांचा मारा करून मराठ्यांनी दंडा - राजपुरीच्या किल्ल्याचा तट जमीनदोस्त केला. पण जंजिरा अजूनही दाद देत नव्हता. तोफांची सरबत्ती सुरूच होती. संभाजी राजे जंजिरा घेण्यासाठी इरेला पेटले होते. पण समोर उभा ठाकलेला दर्याच जंजिऱ्याचा सगळ्यात मोठा संरक्षक बनला होता. आणि समुद्राचा हा अडथळा दूर करण्यासाठी संभाजी महाराजांच्या मनात एक अफाट कल्पना आली. जंजिऱ्याच्या महाद्वारावर हल्ला चढवण्यासाठी त्यांनी जंजिऱ्याची खाडी बुजवून समुद्रावर सेतू बांधायची योजना आखली. श्री रामाने लंका गाठण्यासाठी ज्याप्रमाणे सेतू बांधला त्याच प्रमाणे दगड, लाकडाचे ओंडके, कापसाचे / कपड्यांचे गठ्ठे, माती अशा मिळतील त्या गोष्टी वापरून सेतू बांधणीचे काम सुरू झाले. सेतुचा काही भाग बांधून तयारही झाला पण भरती - ओहोटीच्या वेळा न बसल्याने हे बांधकाम वाहून गेले. पुढे याच सुमारास हसन अलिखान हा मुघलांचा सरदार कल्याण - भिवंडी भागात आल्याने जंजिऱ्याची जबाबदारी सरदारांवर सोपवून संभाजी महाराजांना त्याच्या समाचारासाठी जाणे भाग पडले. 

त्यामुळे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहिले. मात्र छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा घेण्यासाठी सेतू बांधण्याची ही योजना महत्वाकांक्षी तर होतीच पण सोबत त्यांच्या मनावर रामायणाचा असलेला प्रभावही यातून अधोरेखित होतो. 

बहुत काय लिहिणे?

- अदिती कुलकर्णी ✍🏻


संदर्भ : 

१) ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे.

२) मराठी रियासत : खंड २ -  गो. स. सरदेसाई.

PC: Sourced from Internet.



Comments

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...