Skip to main content

शंभूछत्रपतींचे बलिदान पर्व - सरदेसाई वाडा, कसबा संगमेश्वर

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन शौर्य आणि पराक्रमाने नटलेले आहे तर दुसरीकडे त्यांचा मृत्यु म्हणजे अतुल्य धैर्य! त्यांच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि औरंगजेबाला इथेच मूठमाती देता झाला. पण शंभूछत्रपतींच्या चरित्रातील या बलिदान पर्वाला सुरुवात झाली ती कसबा संगमेश्वर या गावी...



कसबा संगमेश्वर हे अलकनंदा, शास्त्री आणि वरुणा नद्यांच्या संगमावर, गर्द अरण्य आणि उंच डोंगराच्या गराड्यात वसलेले एक टुमदार खेडे. 
इ. स. १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळकोकणात स्वारी केली त्यावेळी स्वराज्यात सामील झालेल्या प्रदेशात संगमेश्वरचा देखील समावेश होता. तेव्हा या भागातील अनेक माणसे स्वराज्याच्या कार्यात आली. संभाजीराजांचे गुरू केशव पंडित यांचेही गाव संगमेश्वर . तसेच शंभूराजांची सासुरवाडी - शृंगारपूर - देखील संगमेश्वरहून जवळच होते. दक्षिण दिग्विजयासाठी निघताना महाराजांनी युवराजांना शृंगारपूरास राहण्याची आज्ञा केली होती. त्यावेळी संभाजीराजांचे या भागात बराच काळ वास्तव्य होते. अशा प्रकारे, ते या परिसराशी जोडले गेले. पुढे ते छत्रपती झाल्यानंतरही त्यांचे अनेकदा या भागात वास्तव्य होत असे. 

त्याकाळात हा परिसर प्रभावली सुभ्यात मोडत असे. रंगोबा नायक ( रंगो नाईक ) हे या भागाचे सरदेसाई वतनदार होते. त्यांचा कसबा संगमेश्वर येथे वाडा होता. या वाड्यात छत्रपती संभाजी राजे मे १६८८ च्या सुमारास राहिले होते असे ऐतिहासिक उल्लेख मिळतात. त्यानुसार,
" श्रीमंत कैलासवासी संभाजी महाराज किले रायगडाहून मोगलांचे अडचणीमुळे कबजीचे बुद्धीने जरोर निघोन संगमेश्र्वरी आले ते उन्हाळा जमात वाड्यानाजिक होते. पर्जन्यकाल आला चहूकडे धामधूम ऐसी संधी पडिली त्यात आमचा वाडा मोठा पाहून आमचे वडिलांजवळ जागा मागोन वाड्यात येवून अडीच ( महिने ) पर्यंत राहिले..." अशी नोंद आहे. 

आजही या वाड्याचे ठिकाण कसबा संगमेश्वर येथे पहावयास मिळते. मुंबई - गोवा हमरस्त्यावर कसब्याचा फाटा लागतो. तेथून सरळ आत गेल्यावर प्रथम आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापाशी पोहोचतो. तिथूनच सरळ श्री कर्णेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर, थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूस ' श्री संभाजी रोड ' असे लिहिलेला स्तंभ लागतो. त्याच्या बाजूने पुढे जाऊन डावीकडे एक चिऱ्याच्या बांधणीचे, अस्सल कोकणी शैलीतील घर दृष्टीस पडते. हाच तो ' सरदेसायांचा वाडा.' स्थानिक लोक ' मुकर्रबखानाने ( शेख निजामाने) संभाजी महाराजांना व कवि कलाशांना इथेच, याच वाड्यात पकडले ' असे सांगतात. परंतु इतिहासकारांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे त्याविषयी वेगवेगळे विश्लेषण केले आहे. तसे असले तरी संभाजी महाराजांचे या भागात वास्तव्य होते हे मात्र निश्चित. दस्तुरखुद्द शंभूछत्रपतींचा पदस्पर्श झालेला वाडा आतून पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

    सरदेसाई वाडा 

वरील उल्लेखात म्हटल्याप्रमाणे ( आमचा वाडा मोठा पाहून...) हा वाडा आज दिसतो त्याहून अधिक मोठा असायला हवा, असे पदोपदी जाणवत होते. गुगलवर कलाकुसर केलेल्या भिंती, वीरगळ असे फोटो बघितले होते. पण समोर यापैकी काहीच नव्हते. म्हणूनच वाड्याच्या बाजूने जाणाऱ्या चिंचोळ्या पायवाटेने पुढे चालत गेलो. तिथे काही पडक्या भिंती, जोती दिसली. सगळा परिसर झाडी व पालापाचोळ्याने भरलेला होता. पहिल्यांदा जाणाऱ्या व्यक्तीला पुढे काही असेल याची अजिबात कल्पना येत नाही. जवळपास १०-१५ मिनिटं मागे - पुढे भटकलो तेव्हा एक बरीच खोल विहीर दृष्टीस पडली. तिच्या भिंतींवरही झाडं उगवलेली होती. विहीर डावीकडे ठेऊन तसेच पुढे गेल्यावर शेवटी तीन मंदिरे दिसली. तिथेही बरीच पडझड झालेली आहे. एका मंदिराचा गाभाऱ्याच्या भिंती पूर्णपणे ढासळून गेल्या असून सभामंडप व महादेवाची पिंडी तेवढी शाबूत आहे. दुसऱ्या दोन मंदिरांची स्थिती त्याहून थोडीफार बरी आहे. तीनही मंदिरांच्या बाह्य भिंतींवर सुंदर कोरीवकाम बघायला मिळते. तसेच याच आवारात एक वीरगळ देखील आहे. ती कोणाच्या स्मरणात बनवलेली आहे, ते मात्र कळले नाही. इथून जवळच नदीचे पात्र आहे. 
   भग्नावशेष

या सगळ्या भग्न अवशेषांकडे बघताना डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना इथे घडल्या आहेत. याच परिसरात मराठ्यांचे छत्रपती मुघलांच्या कैदेत पडले. पुढे त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी दिल्लीपतीला नमवले. 
पण आज या वास्तू दुर्लक्षित होऊन आखेरच्या घटका मोजत आहेत. झाडांच्या मुळांनी अनेक ठिकाणी भिंतींचे दगड भेदले आहेत. आजूबाजूला सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसले. ऐतिासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांची अशी दुर्दशा पाहवत नाही.

छत्रपती संभाजी महाराजांनी,
'शिवराजासी आठवावे । जीवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी राहावे । कीर्तिरूपे ।।'
ही समर्थोक्ती सार्थ केली. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून त्यांच्या जीवनाशी निगडीत वास्तू व ठिकाणे जपणे ही आपली जबाबदारी नाही का ? 

संदर्भ:
१. ज्वलज्ज्वलंतेजास संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
२. मराठी रियासत - खंड दुसरा
३. शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख.

    वीरगळ














Comments

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...