Skip to main content

छत्रपती शिवराय : एक बहुश्रुत व्यक्तिमत्त्व

    शालेय स्तरावर प्रत्येकाने इतिहास, राज्यशास्त्र 
(नागरिकशास्त्र), भूगोल अशा विषयांचा अभ्यास केला आहे. मी कला शाखेची विद्यार्थिनी असल्याने आता विविध सामाजिक शास्त्रे ( social sciences ) आम्हाला विशेषत्वाने अभ्यासण्यासाठी आहेत. या विषयांचा अभ्यास करताना, सतत असं जाणवते की आपण शिकत आहोत ते विषय शिकण्यामागचा हेतू, त्यातील अनेक संकल्पना प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे शिवचरित्रात वाचल्या आहेत, किंवा संकल्पनांना समर्पक उदाहरणे वाचली आहेत. त्याच अनुषंगाने आजचा हा लेख....

1. History : 
महाराजांच्या पूर्वी जे शासक होऊन गेले त्यांच्याकडून ज्या चुका घडल्या होत्या त्या महाराजांनी होऊ दिल्या नाहीत. उदा. यादवकालीन कमकुवत हेरखाते ; अनेक राजांचा सदैव बचावात्मक पवित्रा ( आत्मसंरक्षणात्मक धोरण ) या चुका महाराजांनी टाळल्या. तसेच पूर्वीच्या शासकांच्या चांगल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. उदा. प्राचीन प्रशासन पद्धती, इ. 
म्हणजेच ' जे चांगले ते घेणे व पूर्वी ज्या चुका घडल्या असतील त्यातून शिकणे ' असे इतिहासाचे योग्य आकलन महाराजांनी केलेले दिसते. 


2. Political science / politics :
महाराज स्वतः राजनितीतज्ञ होते, हे आपण सारेच जाणतो. आज ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासले जातात त्याच प्रमाणे महाराजांचे इतर राजसत्तांशी असलेले संबंध, त्यांच्या राजकीय हालचाली, डावपेच, विविध तह, इ. अभ्यासण्याजोगे आहेत. तसेच महाराजांनी लावून दिलेली स्वराज्याची प्रशासकीय व्यवस्था, न्यायदान याही बाबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 


3. Economics : 
महाराज स्वराज्याच्या अर्थव्यवस्थेच्या बद्दल नेहमी दक्ष होते. स्वराज्याचा कोष समृद्ध राहावा यासाठी त्यांनी वेळोवेळी मोहिमा हाती घेतल्या. उदा. सुरत, बसनूर, वऱ्हाडातील कारंजा, इ. तसेच व्यापरावरही त्यांचे लक्ष असायचे. स्वराज्याचा मीठ व्यापार सुरळीत चालावा यासाठी त्यांनी प्रभावळीच्या सुभेदाराला लिहिलेले पत्र त्यांच्या व्यापारी धोरणाविषयी उद्बोधक आहे. या पत्रात स्वराज्यातील मीठ विकले जावे, यासाठी बाहेरून आयात करण्यात येणाऱ्या मीठावर जबर कर लावण्याविषयी लिहिले आहे. महाराजांची व्यापारी गलबते सुद्धा दूरदेशी जात.
         " साहुकार ( व्यापारी ) म्हणजे राज्य व राजश्रीची शोभा" 
या आज्ञापत्रातील वाक्यावरून महाराजांनी व्यापाऱ्यांना स्वराज्यात व्यापार करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले हे कळते. तसेच सततच्या आक्रमणांमुळे गांजलेल्या रयतेला त्यांनी आर्थिक मदत केलेली दिसते ; व त्याची सोयीस्कर परतफेड व्हावी याकडेही लक्ष दिले. 
म्हणजेच शेती उत्पादनात वाढ, व्यापार - उद्योगांना चालना, आत्मनिर्भरता, महसूल पद्धतीत सुधारणा, जमिनीची प्रतवारी या गोष्टींना महत्त्व दिलेले दिसते. यावरून महाराजांचे अर्थशास्त्राचे ज्ञान लक्षात येते. 


4. Geography :
 महाराजांचे निकटवर्ती सहकारी, स्वराज्याचे सचिव अनाजीपंत यांनी केलेल्या वर्णनानुसार ॲबे ‌क‌ॅरे या फ्रेंच प्रवाशाने लिहिलेले महाराजांच्या गुणसंपदेचे वर्णन,
 ".... and Geography, of which he ( Shivaji Maharaj ) had made a special study, and which he had mastered and to such an extent as to know not merely all the cities including the smallest townships of the country, but even the lands and the bushes, of which he had prepared very exact charts. "  
महाराजांचा भूगोलाचा अभ्यास किती दांडगा होता हे यावरून कळते. युद्धप्रसंगी महाराजांनी दरवेळी भौगोलिक स्थितीचा विचार केलेला दिसतो. युद्धभूमीची संपूर्ण माहिती आधीपासून करून ठेवल्याने शत्रूला नमवणे सोपे होई. उदा. उंबरखिंडीची लढाई.  


5. Psychology :  
महाराजांनी अनेकदा शत्रू आपल्याबद्दल काय विचार करतो हे ध्यानात घेऊन त्याला आपल्याला हवे त्याप्रमाणे विचार करायला भाग पाडले. उदा. अफझलखान वधाचा प्रसंग. खरे बघायला गेले तर ज्यांनी आदिलशाहीला उघडपणे ललकारून स्वराज्य स्थापले ते महाराज कोणत्या दृष्टीने 'घाबरट' होते ? पण महाराजांनी अफजलखानाला ' सीवा घाबरट आहे ' असे पटवून दिले. त्यामुळे त्याची घमेंड वाढली आणि मग पुढे जे घडले त्याला इतिहास साक्षी आहेच. 
हीच गोष्ट आग्र्याहून सुटकेचे वेळी. महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्याचा इतका सपाटा लावला की पहाऱ्यावरील लोकांची खात्री पटली की पेटाऱ्यात दुसरे - तिसरे काही नाही. 
यावरून महाराजांना ह्युमन सायकॉलॉजीचे किती उत्तम ज्ञान होते हे समजते. 

हा लेख लिहिण्यामागे प्रमुख उद्देश म्हणजे आजही आपण इतिहास, भूगोल म्हटलं की ' पास होण्यापुरते विषय ' असे मानतो. त्या विषयांची खरी उपयोगिता, त्यांचे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी शिवचरित्राप्रमाणे इतरही अनेक उदाहरणे आहेत. ती आपण समजून घेतली तर त्या विषयांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलेल.... 


संदर्भ :
शककर्ते शिवराय : खंड २   - श्री. विजयराव देशमुख.
आज्ञापत्र                         - रामचंद्र पंत अमात्य


Comments

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न: किल्ले साल्हेर  इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या...

शंभूछत्रपती आणि सेतु बांधणी

नुकताच अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहोळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभू श्री रामाच्या जीवनातील अद्भुत प्रसंग आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यातीलच एक म्हणजे सेतू बांधणी !  लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी श्री रामाने वानर सेनेच्या मदतीने केलेल्या सेतू बांधणीची कथा आपण सर्वांनी अनेकदा ऐकलेली आहे. पण असाच एक सेतू बांधणीचा प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांनी देखील केला होता. तीच हकीकत थोडक्यात -  जंजिरेकर सिद्दी हा स्वराज्याला कायम डाचणारा शत्रू. सभासदाने त्याचे वर्णन ' घरात जैसा उंदीर तैसा ( हा ) शत्रू ' या शब्दात केलें आहे. छत्रपती शिवरायांनी अनेकदा प्रयत्न करूनही दुर्दैवाने त्यांना सिद्दीला मुळापासून उखडून टाकण्यात यश आले नाही. इ. स. १६८० - ८१ च्या सुमारासही मुंबईच्या इंग्रजांच्या आश्रयाने स्वराज्याच्या किनारपट्टीवरील प्रदेशावर त्याचे छापे एकसारखे सुरू होते. ही ब्याद एकदाचीच उपटून वडिलांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे आणि रयतेचे होणारे हाल थांबवावे या हेतूने छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दिविरुद्ध जोरदार मोहीम उघडली. त्याचे नेतृत्व त्यांनी स्व...