Skip to main content

किल्ले जयगड

महाराष्ट्राला लांबच लांब किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचे स्वरूप खडकाळ आहे, इथले किनारे अरुंद आहेत आणि अनेक ठिकाणी तर डोंगरांनी आपले पाय थेट समुद्रापर्यंत पसरलेले दिसतात. समुद्रकिनारी, नद्यांच्या मुखाशी स्थित अशा बऱ्याच भू-शिरांनी तटा - बुरुजांचे पागोटे चढवलेले आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या राखणदारासरखे ते डोळ्यात तेल घालून जणू समोरच्या दर्यावर खडा पहारा करीत असतात. या रखवालदारांना म्हणतात - सागरीदुर्ग.
समुद्रकिनारी, नदी किंवा खाडीच्या मुखाशी असलेल्या भू-शिरावर / जमिनीच्या टोकावर हे किल्ले बांधलेले असतात. बहुतेक वेळा तीन बाजूंनी हे पाण्याने वेढलेले असून चौथी बाजू जमिनीला जोडलेली असते. जमिनीच्या बाजूला खोल खंदक खोदलेला असतो. या खंदकात पाणी राहू नये अशी व्यवस्था केलेली असते. पश्चिम किनाऱ्यावर बघायला मिळणारा हा किल्ल्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. कोकणात किंवा एकूणच पश्चिम तटाची भौगोलिक रचनाच अशी आहे की निसर्गतः इथे अनेक बंदरे निर्माण झाली आहेत. सहाजिकच इथे अतिप्राचीन काळापासून समुद्र आणि खाड्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार व वाहतूक होत आली आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी हे सागरीदुर्ग बांधण्यात आले. त्यातीलच एक आहे -  जयगड
   
जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेला आहे. जयगड पोलीस चौकी जवळून जाणारा डांबरी रस्ता थेट गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन संपतो. तिथे पहिल्यांदा आपल्या नजरेत भरते ती गडाची भक्कम तटबंदी आणि दरवाज्याचे अजस्त्र बुरुज. आत जाण्यापूर्वी डावीकडे तटाला लागूनच असलेला खोल खंदक आपल्याला दिसतो. तर उजवीकडे अजून एक तुलनेने लहान दरवाजा आहे. या दरवाज्यातून जाणारी वाट जयगड बंदराकडे जाते.या वाटेने गेले तर डाव्या बाजूस बालेकिल्ल्याची ( म्हणजे मुख्य गडाची ) तटबंदी तर उजव्या बाजूला पडकोटाची ( ज्या भागात जयगड गाव वसले आहे त्याची ) तटबंदी बघायला मिळते. तिथून पुन्हा मागे मुख्य दरवाजापाशी यावे. 
   मुख्य प्रवेशद्वार 

मुख्य प्रवेशद्वार उत्तम स्थितीत असून कमानीवर दोन कमळशिल्प आणि मध्यभागी अजून एका फुलाचे शिल्प कोरलेले दिसते. ही कमान इस्लामी बनावटीची आहे. गडाच्या विविध अंगांचे असे बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला आपोआपच गडाबद्दल भरपूर माहिती मिळत जाते. जणू तो किल्लाच आपल्याला त्याचा परिचय देत असतो. दरवाज्याच्या आत देवड्या आहेत. प्रवेशदारातून आत गेले की दृष्टीस पडते ते मोठे पटांगण आणि त्यात उभे गडावरच्या वास्तूंचे अवशेष. त्यात साधारण मध्यभागी श्री गणेशाचे मंदिर आहे. गडावर आज मितीला ज्या इमारती तग धरून आहेत त्या म्हणजे एक मोडकळीस आलेली तीन मजली इमारत, एक वाडा, एक बांधीव तलाव आणि विहिरी. बाकी जे वाडे किंवा इमारती होत्या त्यांची केवळ जोती आपल्याला पाहायला मिळतात. गडाची तटबंदी आणि बुरुज मात्र आजही सुस्थितीत आहेत. त्यावरून मस्त फेरफटका मारता येतो. तटबंदीवरुन अथांग पसरलेला समुद्र आणि शास्त्री नदीच्या विस्तीर्ण पात्राचे विलोभनीय दर्शन घडते. तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या केलेल्या दिसतील. तसेच तटबंदीत अनेक ठिकाणी खोल्या देखील केलेल्या आहेत. बालेकिल्ल्याला एकूण चौदा बुरुज आहेत. त्यापैकी एक बुरुज इतर बुरुजांपेक्षा वेगळा आहे. हा गडाचा टेहाळणी बुरुज दोन मजली असून याचा आकार चौकोनी आहे. याला ' माडीचा बुरुज ' असे म्हणतात. 
    माडीचा बुरुज 

गडाच्या इतिहासाविषयी सांगावे तर गडाच्या बांधकामाच्या शैलीवरून हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. १६ व्या शतकाच्या अखेरीस तो संगमेश्वरच्या नाईकांनी जिंकून घेतला. त्यानंतर तो आदिलशहाला पुन्हा कधीच घेता आला नाही. स्वराज्यात हा किल्ला नक्की कधी दाखल झाला याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी गडाच्या बालेकिल्ल्याचे काही बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळात झाले असे आपल्याला सांगता येते. पुढे तो कान्होजी आंग्रे आणि मग इंग्रजांकडे गेला. इंग्रजांच्या ताब्यात असताना इंग्रजांनी मुख्य दरवाज्यावर दोन मजली विश्रामगृह बांधले होते ज्याचे अवशेष अजूनही दिसतात. 

जयगड हा किल्ला बांधला गेला तो समुद्री व्यापारावर, वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी. तो काळ वेगळा होता. आजच्या घडीला गड - किल्ले हे संरक्षण प्रणालीतून कालबाह्य झाले आहेत. जयगडचे म्हणावे तर तो आज आधुनिक बांधकाम आणि कारखान्यांनी वेढला गेलाय. परंतु तरीही तो आपले अस्तितत्व ( कसेबसे ) टिकवून आहे. आजही गडाचे ते बुरुज, ती भक्कम तटबंदी आणि तो खोल खंदक जयगडच्या एकेकाळच्या दराऱ्याची साक्ष देतात..... गडावर फिरताना शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींनी इथे केलेल्या जतन - संवर्धन कामाची जाणीव पदोपदी होते.....  आपल्या गौरवशाली इतिहासाचे सर्वच साक्षीदार दुर्लक्षित नाहीत ही जाणीव खरोखर खूप दिलासाजनक आहे......


शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की गड किल्ल्यांकडे पर्यटन स्थळ म्हणून पाहू नये..... हे गड - कोट - किल्ले किंवा कोणतीही ऐतिहासिक वास्तू म्हणजे आपल्या महान देशाच्या महान इतिहासाचे साक्षीदार आहेत, आपला अन्मोल ठेवा आहेत ही जाणीव ठेवायला हवी........ ही जाणीव ज्यांना आहे फक्त त्यांनीच इथे यावे...... त्यासाठी प्रत्येकाला संपूर्ण इतिहास माहीत असलाच पाहिजे असे मी म्हणत नाही..... पण त्याबद्दल मनात आस्था आणि आदर नक्कीच असायला हवा....... या ऐतिहासिक वास्तू म्हणजे pre - wedding photoshoots आणि reels करण्याच्या जागा नाहीत...... हे picnic spots नसून आपली शक्तिस्थाने आहेत ही जाणीव असायलाच हवी..... ती नसेल तर इथे येऊ नये असे माझे स्पष्ट व ठाम मत आहे..... कारण तरच या वारसास्थळांचे खऱ्या अर्थाने जतन - संवर्धन होऊ शकते....... आणि तीच आपल्या इतिहासाला दिलेली खरी मानवंदना असेल..... 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...