Skip to main content

" ज्याचे आरमार त्याचाच समुद्र !!! "

"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्र्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य करावे." 
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार व आरमार निर्मिती विषयी काय धोरण होते हे अगदी मार्मिक शब्दांत सांगणारा आज्ञापत्रातील हा मजकूर. 

स्वराज्याचा विस्तार कोकणात झाला व त्याच्या सीमा दर्याला भिडल्या. अरबी समुद्र स्वराज्याची पश्चिम सरहद्द बनली. या सरहद्दीवर होता जंजिऱ्याच्या सिद्दी आणि इंग्रज, पोर्तुगीज, इत्यादी टोपीकर. (युरोपियन लोक डोक्यावर फेटा, पगडी ऐवजी टोपी घालत असल्याने त्यांना "टोपीकर" म्हटले जाई. ) या लोकांचे किनारा व समुद्रातील व्यापारावर वर्चस्व होते. तसेच त्यांच्या कोकणात वखारी होत्या. जंजिरेकर सिद्द्याचा देखील या प्रदेशावर अंमल होता. त्यामुळे केवळ कोकण काबीज करून भागले नसते. या मुलुखात स्वराज्य अबादित राहण्यासाठी किनारपट्टी व दर्या दोन्ही राखणे आवश्यक होते. हे महाराजांनी अचूकपणे हेरले आणि आरमार उभारणीकडे लक्ष दिले. 

प्राचीन काळापासून जरी भारतात जहाज बांधणी होत असली तरी मध्ये बराच काळ एतद्देशीय सत्तेच्या अभावी युद्धनौका बांधण्याची कला लुप्त झाली होती. त्यामुळे सुरुवातीला या कामासाठी महाराजांनी पोर्तुगीज कारागिरांची नेमणूक केली. नंतर मात्र स्थानिक लोकांनी हे तंत्र आत्मसात केले व स्वराज्यात लष्करी जहाज बांधणीला आरंभ झाला. सुरत, कारंजा यासारख्या मोठमोठ्या शहरातून आणलेली लूट महाराजांनी या कामासाठी वापरली. आरमाराच्या रूपाने पाण्यात आपले वर्चस्व प्रस्थापित व्हावे म्हणून महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. समुद्रात मोक्याच्या ठिकाणी म्हणजे बेटांवर तसेच किनाऱ्यावर जागोजागी दुर्ग बांधले. 
जंजिरेकर सिद्दीला शह देण्यासाठी जंजिऱ्याच्या अगदी जवळ
" राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी " असा पद्मदुर्ग, ज्या किल्ल्याकडे पाहून इंग्रज 
" the fort at henry ( खांदेरी ) in the hands of Shivaji is like a dagger pointed at the heart of Bombay " असे म्हणायचे तो खांदेरी, अलिबाग येथील कुलाबा
मालवण जवळील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग
तसेच जयगड, सुवर्णदुर्ग  ......... हे सारे गड म्हणजे महाराजांच्या आरमाराची ठाणी होती. महाराजांचे आरमार हे मुख्यतः किनारपट्टीच्या संरक्षणासाठी असल्याने त्यात मोठी जहाजे ठेवणे महाराजांनी कटाक्षाने टाळले.  आज्ञापत्रातील या बाबतचा उल्लेख उद्बोधक आहे.
 " चालीच्या गुराबा ना बहुत थोर ना बहुत लहान यैशा मध्यम रीतीने सजाव्या. तैसीच गलबते करावी. थोर बरसे, फरगात जे वाऱ्याविना प्रयोजनाचे नव्हेत यैसे करावयाचे प्रयोजनच नाही. "
    स्वराज्याच्या आरमारात वापरल्या जाणाऱ्या 
गुराबा - डोल काठ्या असलेले एक जहाज; व 
गलबत - शिडाचे जहाज 
या दोन्ही मध्यम आकाराच्या असाव्यात. वारा अनुकूल नसेल तर मोठी, अवजड जहाजे निकामी ठरतात, म्हणून ती शक्यतो आरमारात बाळगू नये. 

जमीन असो वा समुद्र 'गनिमी कावा' हे स्वराज्याचे युद्धतंत्र होते. गनिमी कावा - एक अनोखे युद्धतंत्र या लेखात बघितल्याप्रमाणे या तंत्रात जलद हालचालींना फार महत्त्व आहे. मोठी जहाजे या कामात अडचणीची, म्हणूनच त्यांचा आरमारात समावेश फारसा नव्हता. 'कमीत कमी फौजेनिशी मोठ्या शत्रूचा पराभव' हे तंत्र महाराजांनी इथे देखील वापरलेले दिसते. 

परंतु प्रारंभी इंग्रज व इतर टोपीकर मात्र महाराजांच्या गलबतांना भिकार व "आपले एक गलबत शिवाजीच्या शंभर गलबतांचा फडशा पाडेल" असे म्हणायचे. पुढे लवकरच त्यांना त्यांच्या विधानाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची संधी मिळाली. खांदेरीच्या लढाईत मराठी आरमाराने म्हणजे त्याच "भिकार" गलबतांनी अशी काही कामगिरी केली की तेच टोपीकर इंग्रज म्हणू लागले, 
" आम्हाला खूप काळ यांच्याशी झुंजणे शक्य होणार नाही. महाराजांच्या सरपटणाऱ्या होड्या आम्हाला खूपच आश्चर्यकारक रित्या चकवतात. ( We shall not be able long to oppose him. These little creeping boates deceive us to admiration. ) " 
या उद्गारांवरून महाराजांनी सागरी युद्धातही कशा प्रकारे आपला दरारा निर्माण केला होता हे लक्षात येते. 

 अशा प्रकारे सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज या दर्यावर्दी लोकांनाही अचंबा वाटावा असे उत्तम आरमार महाराजांनी केवळ दोन दशकांच्या काळात निर्माण करून परकीयांचे वर्चस्व असलेल्या सागरी आखाड्यातही स्वराज्याचे सार्वभौमत्व सिद्ध केले.... 

Comments

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...