Skip to main content

के तख्त तज्यो अवरंग...... ( औरंगजेबाने तख्ताचा त्याग केला !!! )

" यावन रावन की सभा, संभू बंध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग ।।
जो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग ।
त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग !!! " 

औरंगजेबाच्या दरबारात कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांची स्तुती करताना म्हटलेल्या या अतिशय सुरेख काव्यपंक्ती..... 

सन १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. शिवरायांच्या माघारी मराठ्यांचे राज्य खालसा करायला फारसा वेळ लागणार नाही या विचाराने बादशाह औरंगजेब दक्षिणेत उतरला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय कडवा प्रतिकार केला. याबद्दल मोगलांचा इतिहासकार महंमद हाशिम खाफीखान म्हणतो की ' दुष्ट संभाजी हा धामधूम करण्यात शिवाजीपेक्षा दहा पटीने अधिक तापदायक होता !!!' यावरून संभाजी महाराजांच्या लढ्याची तीव्रता लक्षात येते. औरंगजेब मराठ्यांमुळे इतका वैतागला होता की रागाच्या भरात त्याने आपली पगडी जमिनीवर फेकून ' संभाजीचा नायनाट केल्यावरच ती धारण करीन ' अशी प्रतिज्ञा केली. सतत नऊ वर्षे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला हैराण केले. 

परंतु दुर्दैवाने १६८९ साली मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे एकनिष्ठ सेवक छंदोगामात्य कवी कलश यांना संगमेश्वर येथे अटक करून बहादूरगड येथे बादशाही छावणीत हजर केले. त्यावेळी ' मोगलाईत प्रचंड उच्छाद मांडणाऱ्या ' संभाजी महाराजांना बेड्यांमध्ये जखडलेले पाहून औरंगजेबाला आपल्यावर ईश्वराची कृपा झाली आहे असे वाटले. त्यामुळे भारावून जाऊन तो सिंहासनावरून खाली उतरला व त्याने परमेश्र्वराची प्रार्थना करून त्याचे हे यश मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. 
हे दृश्य पाहून अतिशय विद्वान अशा कवी कलशांनी त्या क्षणी हे वरील काव्य रचून म्हटले. छत्रपती संभाजी महाराजांना संबोधून कवी कलश म्हणतात की,

" रावणाच्या सभेत जसे हनुमानाला बांधून आणले होते तसेच औरंगजेब यावनासमोर संभाजी राजांना उपस्थित करण्यात आले आहे. मारुतीच्या अंगाला ज्या प्रमाणे शेंदूर शोभून दिसतो त्या प्रमाणे, हे राजन, घनघोर युद्धामध्ये ( शत्रूच्या ) रक्ताने माखलेले तुझे अंग शोभून दिसत आहे. सूर्याला पाहून काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो तसेच तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या तक्तचा त्याग केला आहे !!! " 

बेड्यांमध्ये जखडलेले असताना देखील कवी कलशांनी केवळ शब्दांनी भर दरबारात औरंगजेबाला या काव्यातून चीत केले. अखेरच्या क्षणापर्यंत छत्रपती संभाजी महाराज व  कवी कलश यांचे वर्तन किती बाणेदारपणाचे होते हे या प्रसंगावरून नक्कीच लक्षात येईल.... 


Comments

  1. सुरेख.
    थोडक्यात पण योग्य शब्दांत प्रसंगाचं वर्णन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...