'..... जी बुद्धि पांच शाहीस शत्रूच्या झुलवी,
जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी,
जी शक्ती बलोंमत्तास पदतली तुडवी.....'
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे व बुद्धी चातुर्याचे केलेले हे वर्णन किती अचूक आहे !!
आदिलशाही, मुघल या बलाढ्य शाह्या महाराष्ट्राच्या भूमीवर सत्ता गाजवत असतानाच सह्याद्री लगत असलेल्या मावळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. लवकरच युद्धप्रसंग उद्भवले. परंतु या शाह्यांच्या समोर स्वराज्याचे बळ तोकडे. तरीसुद्धा स्वराज्याने मोठमोठाली सैन्य गारद केली. हे शक्य झाले कसे ??
याचे उत्तर होते शिवाजी महाराजांची युद्धनीती..... म्हणजेच गनिमी कावा......
आजचा लेख याच विषयी.....
गनिमी कावा हे एक युुद्धतंत्र आहे.
कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या फौजेचा संपूर्ण पराभव म्हणजेच गनिमी कावा.
हे तंत्र महाराजांनी स्वतः विकसित केले नाही. त्यांच्या आधी मलीक अंबर, शहाजी राजे यांनी देेेेखील ही युद्ध पद्धती वापरली होती. परंतु महराजांनी गनिमी काव्याचा आपल्या युद्धनीतीत अत्यंत प्रभावीपणे वापर करून स्वराज्य निर्माण केले.
मावळ प्रांत हे स्वराज्याचे केंद्रस्थान होते. येथूनच पुढे स्वराज्याचा विस्तार झाला. मावळचा हा मुलूख सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला. त्यामुळे हा सर्व प्रदेश अतिशय अवघड. युद्धप्रसंगी या दुर्गमतेचा महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला.
आदिलशाही किंवा मुघली फौजा अतिशय संथ गतीने हालचाली करत. फौजेत हत्ती, अवजड तोफा सोबत घेतल्या जात. तसेच सैन्यासोबत बाजारबूणगे असत. त्यामुळे या फौजांना मावळ सारख्या दुर्गम भागात हालचाल करणे अवघड होत असे. या उलट महाराजांच्या फौजेत बाजारबूणगे, हत्ती, तोफा नेण्यास बंदी होती. त्यामुळे त्या अतिशय चपळ होत्या. याचा फायदा युद्धात होत असे.
हळूहळू येणाऱ्या यवनी सैन्यावर मावळ्यांच्या लहान लहान तुकड्या छापे मारीत. याने यवनी फौजेत गोंधळ माजे. परिणामतः शत्रुसैन्याची फळी विस्कळीत होत. याचा फायदा घेऊन मावळे गनिमास आर्थिक दृष्ट्या अपंग करीत. शत्रूला हैराण करणे तसेच स्वराज्याची आर्थिक बाजू बळकट ठेवणे हे दुहेरी हेतू यातून साध्य होत. छापे घालणाऱ्या या मावळी तुकड्यांचा गनीम पाठलाग करू लागला की ते आजूबाजूच्या रानात, तर कधी जवळच्या एखाद्या किल्ल्यात पळून जात. स्वराज्याचे कमीत कमी नुकसान व्हावे हाच या मागील मुख्य उदेश्श.
कधी कधी मावळे मुद्दाम शत्रूस पाठलाग करायला भाग पाडी. आपला जय होत आहे असे वाटून गनीम दुप्पट वेगाने मावळ्यांच्या मागे येई. मावळे त्यांना एखाद्या अवघड ठिकाणी, कोंडीत पकडी आणि दबून बसलेले मावळे त्यांचा सहज पाडाव करायचे.
स्वराज्याची पहिली म्हणजे पुरंदराच्या लढाईपासून, अफझलखान, सिद्दी जौहर, उंबरखिंडीत कारतलबखान, ई. प्रत्येक युद्धात वापरलेले डाव, युक्त्या खरोखरच थक्क करतात. जर आपण हे डावपेच लक्षपूर्वक अभ्यासले तर त्यातून महाराजांनी सह्याद्रीच्या दूर्गमतेचा केलेला वापर अगदी सहज दिसतो. त्याच बरोबर महाराजांचे युद्ध कौशल्य व व्यवस्थापन किती उत्तम होते हे देखील लक्षात येते. महाराजांच्या फौजेत शिस्त होती. गनिमी काव्यासाठी नियोजन व त्याची अंमलबजावणी हे महत्वाचे. प्रत्यक्ष लढाई संबंधी नियोजनासोबतच गनिमाचा स्वभाव, त्याची विचारसरणी, सेनापतीचे सैन्याशी संबंध आणि इतर प्रत्येक लहान मोठ्या बाबीकडे त्यांचे बारीक लक्ष असे. यामुळे महाराजांना शत्रूचा अचूक अंदाज यायचा व त्यानुसार केलेले नियोजन स्वराज्यास नेहमी उपयुक्त ठरले.
या विधानाची सत्यता पटवणाऱ्या अनेक घटना आहेत. त्यातीलच एक अतिशय विलक्षण घटना म्हणजे अफझलखान वध..... ही घटना महाराजांची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण होती.... म्हणूनच याविषयी पुढील लेखातून सविस्तर जाणून घेऊया......
महाराजांच्या युद्धनीती चा महत्त्वाचा पैलू अतिशय योग्य शब्दात मांडला आहे... पुढील लेखनासाठी हार्दिक शुभकामना
ReplyDeleteVery appropriate
ReplyDelete