"नवे जुने तीनशे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत."
हे वाक्य म्हणजे महाराष्ट्रातील रयतेचा अभिमान आहे, विश्वास आहे, स्वाभिमान आहे. या वाक्यानेच सामान्य रयतेस बलाढ्य शत्रूशी लढण्याचे बळ दिले, उमेद दिली. हे वाक्य आहे एका युगपुरुषाचे, स्वराज्याचे पहिले छत्रपती......... छत्रपती शिवाजी महाराजांचे !!
नमस्कार,
छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट यांचे नाते हे या गडांसारखेच अभेद्य आहे. हे गड ज्या सह्याद्रीवर विराजमान आहेत त्याची सह्याद्री - कणा स्वराज्याचा या लेेखातून आपण ओळख करून घेतली होती. आज आपण शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांचे नाते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
सह्याद्रीच्या शिखरांवर कित्येक लहान मोठे गड आहेत. यातले बरेचसे गड शिवाजी महाराजांच्या आधी होऊन गेलेल्या शासकांनी बांधलेले. पण महाराजांनी या गडकोटांना एकत्र गुंफले आणि स्वराज्य उभे केले.
स्वराज्याच्या मुलुखात अनेक ठिकाणी गड होते पण दुर्लक्षित झालेले. महाराजांनी अशा किल्ल्यांची डागडुजी करून घेतली. जिथे तटबंदी, बुरुज नव्हते तिथे ते बांधले. त्याच बरोबर सुरुंग लावून कडे ताशीव आणि अवघड केले. यामुळे प्रत्येक किल्ला बळकट होऊ लागला.
नवे गडकोट बांधतानाही ही खबरदारी घेतली जाई. गडाच्या आजूबाजूला एखादा असा डोंगर वा टेकडी असेल जी भविष्यात किल्ल्यास धोकादायक ठरू शकते ती सुरुंग लावून उडवली जाई किंवा तिथे छोटा कोट बांधला जाई. जसे किल्ले रायगड व लिंगाणा.
गड बांधण्यासाठी जागा निवडतानाही महाराजांची दूरदृष्टी आपल्याला बघायला मिळते. जागा जेवढी मोक्याची तेवढीच त्या जागेस मिळालेली नैसर्गिक दुर्गमताही महत्वाची असायची. उदाहरणार्थ,
प्रतापगडाच्या दुर्गमतेचा झालेला उपयोग अफझलखानाच्या भेटी समयी बघायला मिळतो.
सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग या जलदुर्गांमुळे स्वराज्याचे आरमार अधिक मजबूत झाले.
गड - किल्ले हे मुख्यतः सभोवतालच्या मुलुखाची व्यवस्था व सुरक्षेसाठी असायचे. त्यामुळे गडांच्या रचनेमध्ये देखील आपल्याला महाराजांचा गनिमी कावा दिसतो. रायगडावरील महादरवाजा, त्याची रचना, तिथे मुद्दाम बनवलेले पाण्याचे हौद ,ई. हे या गोष्टीची साक्ष देतात. किल्ल्यांच्या रचनेमधील वैशिष्ट्यांमुळे ते बळकट व अभेद्य बनले. याचा फायदा आतील फौजेस होत असे. वेढा पडल्यास, गड लढवता यावा म्हणून नेहमी खूप दिवस पुरेल इतके अन्नधान्य, दारूगोळा सज्ज ठेवलेला असायचा.
बाहेरील शत्रूशी लढताना आत फंद फितुरी होऊ नये, तसेच गडावर एकोपा रहावा यासाठीही स्वराज्यात योजना होती. प्रत्येक गडाची व्यवस्था बघायला वेगवेगळ्या जातीची लोकं असायची. गडकरी, सबनीस व कारखानीस हे प्रत्येक किल्ल्यावरचे मुख्य अधिकारी असत. प्रत्येक जण नेमून दिलेली जबाबदारी पूर्ण करायचा. नियम मोडणाऱ्यास कडक शासन केले जाई. त्यामुळे गडावर व एकूणच स्वराज्यात शिस्त होती. म्हणून स्वराज्यातील गडकोट काबीज करणे ही सोपी गोष्ट नव्हती. या गोष्टीचा प्रत्यय पुढे घडलेल्या घटनांमध्ये दिसतो. बादशहा औरंगजेबासही स्वराज्याचे गडकोट संपूर्णपणे काबीज करता आले नाहीत.
गडकिल्ल्यांच्या आसऱ्याने शिवाजी महाराजांनी साल्हेर अहिवंतापासून कावेरी पर्यंत निष्कंटक राज्य स्थापले. खरोखरच दुर्ग हे स्वराज्याचे व सह्याद्रीचे पोलादी चिलखत आहे. या चिलखतीने सदैव स्वराज्याचे प्राण वाचवले.
एखाद्या योध्द्याचे चिलखत जसे सगळ्यांना त्याच्या पराक्रमाची आठवण करून देते तसेच स्वराज्याचे हे चिलखत आपल्याला स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्या असंख्य मावळ्यांची आठवण करून देते..... आणि जाणीव करून देते की महाराज का म्हणायचे .......
" संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !!! " .....
Good going
ReplyDeleteह्या पुढे आता एका एका किल्ल्याचे वैशिष्ठ्य अभ्यासा
खूप छान
ReplyDeleteअभ्यासपूर्ण लेख
अत्यंत नेमके लेखन व स्वराज्यात गडाचं असलेले महत्त्व योग्यप्रकारे अधोरेखित केले आहे.. खूप शुभेच्छा.
ReplyDeleteKhupach sundar .....
ReplyDeleteVakyrachna apratim
Trekking aathvan khup divsani ali.....thank you
Keep going👍👍
From may....